'पोलिसांच्या कामाचा राज्याला अभिमान'; उपमुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीवर आधारीत बनविलेल्या 'फिल द बीट' या पुस्तिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले.

पुणे : पुणे पोलिसांनी माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर वाढला आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे कोरोनाच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. तसेच पोलिसांना चांगली घरे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

बारामतीच्या नवीन वाहतूक आराखड्याला हिरवा कंदिल

लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी पवार यांनी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे, अशोक मोराळे, सुनील फुलारी यांच्यासह सर्व पोलिस उपायुक्त उपस्थित होते.

यावेळी शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या 2012च्या तुकडीतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला पवार यांनी भेट देत कर्मचाऱ्यांची विचारपुस केली. तसेच यावेळी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीवर आधारीत बनविलेल्या 'फिल द बीट' या पुस्तिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. 

- 'या' २० मार्गांवर बस सुरू करता येईल; पीएमपीचा महापालिकेसमोर प्रस्ताव!

पवार म्हणाले, ''कोरोना नियंत्रणासाठी राज्यातील पोलीसांनी मागील तीन महिन्यांपासून आपल्यातील संवेदनशीलता दाखवून पोलिस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढेही शासनाच्या विविध आदेशांची अंमलबजावणी करुन कोरोनाला हरवुयात. नागरीकांनीही पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत.'' पोलिसांनीही कोरोनाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट काम केले आहे. मात्र पोलिसांनीही सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करुन स्वतःच्या आरोग्याची पुरेशी काळजी घ्यावी, असेही पवार यांनी सांगितले. 

- 'आरटीई'ची दुसरी सोडत जाहीर करा, अन्यथा...; मनसे विद्यार्थी संघटनेने दिला इशारा!

डॉ. वेंकटेशम म्हणाले, ''पोलिसांनी लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसीं, स्क्रिनिंग, प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवितानाच जनजागृती करण्यासही भर दिला. पोलिस शिपायापासूने ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यामध्ये योगदान दिले आहे.'' 

लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपायोजनांची दृकश्राव्य सादरीकरणातून माहिती दिली. डॉ. शिंदे यांनी सोशल पोलिसींग सेलने केलेले काम, तर मोराळे यांनी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग, स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीची मांडणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State is proud of the work done by police during Corona Pandemic said Deputy CM Ajit Pawar