PM मोदींविषयी केलेलं वक्तव्य आंबेडकर घराण्यातील प्रकाशजींना शोभणारं नाही-संजय काकडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम न राहिल्यानेच जनतेने त्यांना नाकारले आहे. आतापर्यंत ते चारवेळा लोकसभेची निवडणूक हारले. विधानसभेतील निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला.

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी असंसदीय भाषेचा वापर केला. आंबेडकर घराण्यात जन्मलेल्या प्रकाशजींना हे शोभा देणारे नाही. प्रकाशजी हे बोलू शकतात पण, प्रकाश आंबेडकर हे बोलू शकत नाही. पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे वक्तव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची पायमल्ली करणारे आहे, अशा शब्दांत माजी खासदार संजय काकडे यांनी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली. या महामानवाचे प्रकाश हे नातू आहेत. त्यांच्याकडून आलेले हे वक्तव्य लज्जास्पद आहे. त्यांनी घटनात्मक पदावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यघटनेची झालेली पायमल्ली ही थेट डॉ बाबासाहेब यांच्या विचारांचीच पायमल्ली आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा- देशात पहिल्या टप्प्यात 3 कोटी कोरोना योद्धांना देणार लस, सरकारची तयारी

प्रकाश आंबेडकर हे सवंग प्रसिद्धी मिळणारी वक्तव्ये करून राजकारण करीत आले. त्यांना अशी वक्तव्य करून स्टार व्हायचे आहे. परंतु, ते बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम न राहिल्यानेच जनतेने त्यांना नाकारले आहे. आतापर्यंत ते चारवेळा लोकसभेची निवडणूक हारले. तसेच विधानसभेतील निवडणुकीतही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिका, नगरपालिकांतही त्यांना विजय मिळवता आला नाही.

प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांच्या घराण्यातील असल्यानेच त्यांना मान मिळाला. मायावती बाबासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन गेल्या तर, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. परंतु, प्रकाश आंबेडकर सतत हार पत्करत गेले. राजकारणात जेव्हा प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन समोर येतील तेव्हाच जनता त्यांना स्वीकारतील.

हेही वाचा- Bihar Election - Video : तेजस्वी यादवांवर भरसभेत फेकली चप्पल; व्हिडीओ झाला व्हायरल

रामदास आठवले बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे ते खासदार झाले, मंत्री झाले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी घटनात्मक पदांचा व राज्यघटनेचा सन्मान करावा तेव्हाच त्यांचाही लोक सन्मान करतील ही अपेक्षा आहे, असेही संजय काकडे म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement made about PM Modi does not suit Prakashji of Ambedkar family says Sanjay Kakade