Crime
Crime

स्टेशन डायरी पुन्हा बंद होणार

पिंपरी - पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली जाते. मात्र, बदलत्या काळात गुन्हे नोंदविण्याची पद्धतही बदलत गेली आहे. आता स्टेशन डायरीची जागा संगणकाने घेतली आहे. गुन्हे नोंद करण्यासाठी ‘द क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स्‌’ (सीसीटीएनएस) या संगणक प्रणालीचा वापर केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी स्टेशन डायरी बंद करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. परंतु, बहुतांश पोलिस ठाण्यांत अद्यापही स्टेशन डायरी सुरूच आहे. यामुळे पुन्हा एकदा स्टेशन डायरी बंद करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.

पोलिस महासंचालकांनी स्टेशन डायरी बंद करण्याचे आदेश १५ सप्टेंबर २०१५ रोजी दिले होते. स्थानिक पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सर्वच पोलिस ठाण्यांत ‘सीसीटीएनएस’ प्रणाली वापरण्यास सुरवात झाली. मात्र, अद्यापही बहुतांश पोलिस ठाण्यांत स्टेशन डायरीही सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना स्टेशन डायरी बंद करण्याचा अध्यादेश काढावा लागला आहे. डायरी बंद करून ठाण्याचे कामकाज आता ‘सीसीटीएनएस’द्वारे करावे, असेही अध्यादेशात म्हटले आहे.

सर्व पोलिसांना ऑनलाइन तक्रार कशी घ्यावी; यासाठी २०११ पासून ‘सीसीटीएनएस’ प्रणाली हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे ज्या जुन्या कर्मचाऱ्यांना संगणकाचे ज्ञान नाही, त्यांनाही सक्‍ती योग्य नसल्याचे वाटले. मात्र, शिस्तीच्या पोलिस दलात याबाबत विरोध करता येत नसल्याने अनेकांनी हा बदल स्वीकारत प्रशिक्षण घेतले व त्यात पासही झाले. तरीही एकाच घटनेची स्टेशन डायरी आणि ‘सीसीटीएनएस’ अशी दोन्ही ठिकाणी नोंद सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस महासंचालकांनी पुन्हा एकदा अध्यादेश काढला.

‘त्या’ घटनेची आठवण
अपर पोलिस आयुक्‍त प्रकाश मुत्याळ यांनी स्टेशन डायरी बंदचे आदेश दिले होते. भोसरी पोलिस ठाण्यात मुत्याळ यांनी भेट दिली असता, तेथे सुरू असलेली स्टेशन डायरी त्यांनी फाडली. यामुळे सर्वच पोलिस ठाण्यांनी याचा धसका घेतला. परंतु, चोरी-छुपे स्टेशन डायरी सुरूच ठेवली; ती अद्यापही कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com