स्टेशन मास्तर पद रद्द होणार?

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पिंपरी - रेल्वे प्रशासनाने वडगाव मावळ स्टेशन मास्तरचे पद काही दिवसांपूर्वीच रद्द केले. त्यापाठोपाठ आकुर्डी, पिंपरी आणि दापोडी येथील स्टेशन मास्तरचे पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे कारण देण्यात येत आहे. 

पिंपरी - रेल्वे प्रशासनाने वडगाव मावळ स्टेशन मास्तरचे पद काही दिवसांपूर्वीच रद्द केले. त्यापाठोपाठ आकुर्डी, पिंपरी आणि दापोडी येथील स्टेशन मास्तरचे पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे कारण देण्यात येत आहे. 

पिंपरीमध्ये मोठी बाजारपेठ आहे. विविध ठिकाणांहून व्यापारी, नागरिक तेथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे प्रवाशांची कायम वर्दळ असते. येथे अनेकदा अपघातही होतात. स्टेशन मास्तरचे पद रद्द केल्यास प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात एखादा अपघात घडल्यास स्टेशन मास्तर रुग्णवाहिकेची व्यवस्था करतो. स्टेशनमधील सोईसुविधांबाबत प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करतो; परंतु हे पद रद्द झाल्यास ही कामे कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

हे पद रद्द करण्यामागील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे कारण देण्यात येत असले, तरी मुंबईतील अनेक स्थानकांवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आहे. तरीही तेथे स्टेशन मास्तर कार्यरत आहेत. असे असताना या तीन ठिकाणचे हे पद रद्द करण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, याबाबत रेल्वे प्रशासनात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

लोणावळ्यापासून तळेगावपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर ते शिवाजीनगरपर्यंत करण्याचे नियोजन आहे. हे काम होईपर्यंत आकुर्डी, पिंपरी, दापोडी येथील स्टेशन मास्तर पद रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याचे सध्या विचाराधीन नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्यरेल्वे

आकुर्डी स्थानकाची स्थिती सध्या चांगली आहे; परंतु पिंपरी, दापोडी येथील स्थिती फारशी चांगली नाही. रात्री आठनंतर तेथे प्रवाशांच्या सुरक्षेचे प्रश्‍न जाणवतो. स्टेशन मास्तर पद रद्द झाले, तर समस्यांमध्ये आणखी वाढ होईल.
- अनिकेत सावलीकर, प्रवासी, तळेगाव

Web Title: station master post railway