पुण्यात गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटविला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जंगली महाराज रस्त्यावर महापालिकेचे संभाजी महाराज उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

पुणे - महाराष्ट्रातले शेक्सपिअर समजले जाणारे ख्यातनाम नाटककार राम गणेश गडकरी यांनी 'राजसंन्यासी' या नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, असा आरोप करत संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री हटवला. पालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडकडून हे 'नाट्य' सुरु झाले आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

जंगली महाराज रस्त्यावर पालिकेचे संभाजी उद्यान आहे. या उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा होता. 23 जानेवारी 1962 मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते; पण हा पुतळा हटवा, अशी मागणी 'संभाजी ब्रिगेड'कडून होत होती. अखेर रात्री अडीचच्या सुमारास संभाजी उद्यानातील हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हटवला आणि शेजारच्या मुठा नदीत तो टाकून दिला.

या घटनेनंतर गोंधळ उडू नये म्हणून उद्यानाच्या परिसरात मंगळवारी सकाळी पोलिसांनी सुरक्षितता वाढवली. या वेळी काही कार्यकर्त्यांनी गडकरींच्या विरोधात घोषणाही दिल्या.

Web Title: statue of ram ganesh gadkari removed by sambhaji brigade in pune