टाटा कंपनीच्‍या पुतळयाचे दहन, मुळशी धरणग्रस्‍तांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

ब्रिटीश राजवटीत मुंबईत भांडवलदारांना वीज पुरवठा करण्‍यासाठी टाटांनी मुळशीत खाजगी धरण बांधले. सक्‍तीने जमिनी घेण्‍यात आल्‍या. ५२ गावे, हजारो धरणग्रस्‍त झाले. मुळशी धरण बांधून सुमारे १०० वर्षे झाली. चार-पाच पिढया संपल्‍या पण धरणग्रस्‍तांचा संघर्ष काही संपला नाही.

माले(पुणे) : मुळशी धरणग्रस्‍तांना जगण्‍याच्‍या सुविधा घरबांधकाम, दुरुस्‍ती नाकारत मरणानंतर मात्र जाळण्‍यासाठी स्‍मशानभुमी बांधून धरणाग्रस्‍तांच्‍या जखमांवर मीठ चोळणाऱ्या टाटा कंपनीच्‍या प्रवृत्‍तीचा धरणग्रस्‍तांच्‍यावतीने निषेध करण्‍यात आला. शुक्रवारी (ता.२) बार्पे खुर्द (ता.मुळशी) येथे टाटा कंपनीच्‍या पुतळयाचे दहन कंपनीने बांधुन दिलेल्‍या स्‍मशानभुमीतच करण्‍यात आले.

ब्रिटीश राजवटीत मुंबईत भांडवलदारांना वीज पुरवठा करण्‍यासाठी टाटांनी मुळशीत खाजगी धरण बांधले. सक्‍तीने जमिनी घेण्‍यात आल्‍या. ५२ गावे, हजारो धरणग्रस्‍त झाले. मुळशी धरण बांधून सुमारे १०० वर्षे झाली. चार-पाच पिढया संपल्‍या पण धरणग्रस्‍तांचा संघर्ष काही संपला नाही. पुनर्वसन, नागरी सुविधा आणि रोजगारासाठी धरणग्रस्‍तांचा संघर्ष सुरुच आहे.

गावठाण बुडीत झाल्‍यानंतर मुळ गावां शेजारीच तर कुठे आपल्‍याच पण टाटांनी संपादित केलेल्‍या जमिनींवर जागांवर लोक राहू लागली. काळ लोटला धरणग्रस्‍तांचे कुटूंब वाढले. नवीन पिढया आल्‍या. घर दुरुस्‍तीला टाटा कंपनीने मज्‍जाव सुरु केला. नवीन बांधकाम होऊच देत नाहीत. वादळात पडझड झालेल्‍या घराचीही हीच अवस्‍था. दुरुस्‍ती करावी तर कंपनीची कायदेशीर कारवाईचा बडगा. अशा जात्‍यात धरणग्रस्‍त अडकून पडले आहेत.  परंतु, याच धरणग्रस्‍तांची मरणानंतरची सोय मात्र टाटा कंपनीने करुन ठेवली आहे. गावोगावी टाटा कंपनीने स्‍मशानभुमी बांधुन ठेवल्‍या आहेत. पण धरणग्रस्‍तांना त्‍यांची घरे दुरुस्‍त करण्‍याची परवानगी नाही. कारण घरे टाटा कंपनीच्‍या जागेवर आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाटा कंपनीच्‍या या प्रवृत्‍तीविरोधात धरणग्रस्‍तांनी बार्पे गावातील स्‍मशानभुमीत एकत्र येऊन टाटा कंपनीचा पुतळा कंपनीने बांधलेल्‍या स्‍मशानभुमीत जाळुन निषेध केला. यावेळी स्‍थानिक टाटा धरणग्रस्‍त संघ मुळशीचे अध्‍यक्ष संतोष कदम, सचिव एकनाथ दिघे, भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर, माजी उपसरपंच संजय गोरे, माजी सरपंच गोविंद सरुसे, ग्रामपंचायत सदस्‍य मारुती कुडले, अनिल मापारे, सुनंदा कुंभार, दत्‍ता दिघे, दत्‍ताराम चव्‍हाण, अंकुश दहिभाते, शंकर दिघे, विलास दिघे, तंटामुक्‍ती अध्‍यक्षा कांताबाई दिघे, दिलीप तोंडे, उमेश मापारे, कैलास मापारे, विश्‍वनाथ मापारे महाराज, विविध गावांतील धरणग्रस्‍त, महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते.

पावसाळा संपला तरी भामा आसखेड भरता भरेना!​

संतोष कदम म्‍हणाले, 'जीवंत माणसांना जगवण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍या ऐवजी ते मेल्‍यावर त्‍यांना जाळण्‍यासाठी स्‍मशानभुमी बांधुन देणा-या टाटा कंपनीच्‍या पुतनामावशीच्‍या प्रेमाचा दुतोंडीपणा उघड झाला आहे.' 

'धरणग्रस्‍तांनी एकत्र येऊन नियोजीतपणे लढा दिला पाहिजे. पुनर्वसनाची स्वप्‍ने सत्‍यात आणण्‍यासाठी आपल्‍या पिढीला लढा पुन्‍हा उभारण्‍याशिवाय पर्याय नाही.' असे एकनाथ दिघे, गोविंद सरुसे यांनी सांगितले. 

मंचर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण : ३ जणांवर गुन्हा दाखल

'स्‍मशानभुमी' विकासाची व्‍याख्‍या
मरणानंतर मृतदेहाचा अंत्‍यविधी व्‍यवस्थित व्‍हावा यासाठी स्‍मशानभुमी असते. पण हीच माणसं जीवंत असताना त्‍यांना कायदा, मालकीच्‍या नावावर छळलं जातं. धरणग्रस्‍तांच्‍या रोजगारासाठी त्‍यांना जगवण्‍यासाठी कंपनीने काय केले.  दिखाव्‍यापुरत्‍या इमारती. गावात स्‍मशानभुमी नावाचा सिमेंटचा सांगाडा उभा केला म्हणजेच विकास का ? असा उद्विग्‍न सवाल धरणग्रस्‍त अनिल मापारे यांनी केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: statue of Tata company Burn during agitation by Mulshi dam victims