हरित लवादाचा पिंपरी महापालिकेला दणका: दिला 'हा' आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

"इंद्रायणी नदी पात्रालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत असून, बेकायदा आहे. त्यामुळे महिन्याभरात प्रकल्पाचे बांधकाम जमीनदोस्त करावे. त्याबाबतचा अहवाल सादर करावा,'' असे राष्ट्रीय हरित लवादाने आदेशात म्हटले आहे. 

पिंपरी : "इंद्रायणी नदीपात्रालगत उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम त्वरित थांबविण्यात यावे, झालेले बांधकाम पाडण्यात यावेत,''असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला दिला. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी चपराक बसली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराच्या उत्तर सीमेवरून इंद्रायणी नदी वाहते. तिच्या पात्रालगत चिखलीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले होते. त्यास चिखली, मोशी परिसरातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध केला होता. शिवाय, देहू आणि आळंदी दोन्ही तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत. त्यामुळे प्रकल्पाला वारकऱ्यांचाही विरोध होता. मात्र, सर्वांचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर प्रकल्पाला मंजुरी दिली होती. दीड वर्षांपूर्वी प्रकल्पाचे काम सुरू केले होते. जुलै-ऑगस्टमध्ये पुरामुळे प्रकल्प पाण्याखाली गेला होता. 

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

पर्यावरणप्रेमींना न्याय 
पर्यावरणाची हानी होऊ नये व नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पविरोधात फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने जून 2019 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही तक्रार केली होती. इंद्रायणी नदीपात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका अनधिकृतपणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारत आहे, असे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटिस बजावली होती. तरीही काम सुरूच होते. त्यामुळे फेडरेशनने हरित लवादाकडे दाद मागितली. त्यावर सुनावणी होऊन 22 जून रोजी सविस्तर अहवाल मागितला होता. त्यानुसार सहा जुलै रोजी स्थळ पाहणी करून अहवाल दिला होता. त्यानंतर प्रकल्पाला स्थगिती दिली होती. प्रकल्पाचा पायाभरणी व सीमा भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले होते. आता पर्यावरणप्रेमी व महापालिकेची बाजू ऐकून लवादाने प्रकल्पाचे काम पाडून अहवाल देण्याचा आदेश दिला. 

न्यायालयाने केला प्राजक्ता माळीविरुद्धचा खटला रद्द

हरित लवादाचा आदेश 
"इंद्रायणी नदी पात्रालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत असून, बेकायदा आहे. त्यामुळे महिन्याभरात प्रकल्पाचे बांधकाम जमीनदोस्त करावे. त्याबाबतचा अहवाल सादर करावा,'' असे राष्ट्रीय हरित लवादाने आदेशात म्हटले आहे. 

सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा : संभाजीराजे

"चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निळ्या पूररेषेत येत असल्याने हरित लवादाने पाडण्याचा आदेश दिला आहे. प्रकल्पाचे काम केवळ पाच टक्केच झालेले होते. लवादाच्या आदेशानंतर बांधकाम थांबविण्यात आले आहे.'' 
- मकरंद निकम, सह शहर अभियंता 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stay order of the Chikhli Sewage water treatment works near Indrayani river