esakal | दहावी, अकरावीबाबत अद्यापही संभ्रमावस्था

बोलून बातमी शोधा

Exam
दहावी, अकरावीबाबत अद्यापही संभ्रमावस्था
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन कसे होणार, अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाणार, असे प्रश्न उभे राहिले. त्यावर अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार होऊ लागला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. परिणामी, दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश कसे होणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई आणि अन्य राज्यांतील काही शिक्षण मंडळांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल दिला जाईल, असे सांगण्यात आले. हे अंतर्गत मूल्यांकन कसे करायचे आणि दहावीनंतर विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश कसा द्यायचा, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई, पुणे, नागपूरमधील नामांकित महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी नुकताच संवाद साधला.

हेही वाचा: Pune Corona Update: दिलासादायक! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक

ऑनलाइन बैठकीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डॉ. शामराव कलमाडी कनिष्ठ महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राचार्यांशी झालेल्या चर्चेबाबत गायकवाड यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे.

प्राचार्यांशी झालेल्या चर्चेतून कोणत्याही मुद्द्यांवर एकमत झाले नाही. दरम्यान, अनेक वर्षांपासून बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठीही अशीच परीक्षा घेता येईल, असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सुचविले आहे.

या मुद्द्यांवर झाली चर्चा

  • इयत्ता आठवी आणि नववीच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेश द्यावा.

  • शाळांद्वारे अंतर्गत मूल्यमापन व्हावे आणि त्यानुसार कार्यवाही व्हावी.

  • अकरावीसाठी प्रवेश परीक्षा असावी.

  • वर्षभर शाळांमध्ये घेतलेल्या ‘टेस्ट’च्या आधारे मूल्यांकन व्हावे.

  • दहावीनंतर अकरावी, आयटीआय आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निश्चित धोरण असावे.