रात्रं-दिन उत्खनन

पीतांबर लोहार
गुरुवार, 14 जून 2018

पिंपरी - मोशी, चऱ्होली, चोविसावाडी येथील दगड खाणींची क्षमता संपल्यामुळे एक जानेवारी २०१९ पासून येथील उत्खनन बंद करण्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. तेव्हापासून खाणींमधून रात्रं-दिन उत्खनन आणि खडी मशिन व खडी, डबर, चुरा वाहतूक करणारी वाहनेही सुरू आहेत. आतापर्यंत जमीन सपाटीपासून दीडशे फूट खोल उत्खनन झालेले आहे. 

पिंपरी - मोशी, चऱ्होली, चोविसावाडी येथील दगड खाणींची क्षमता संपल्यामुळे एक जानेवारी २०१९ पासून येथील उत्खनन बंद करण्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. तेव्हापासून खाणींमधून रात्रं-दिन उत्खनन आणि खडी मशिन व खडी, डबर, चुरा वाहतूक करणारी वाहनेही सुरू आहेत. आतापर्यंत जमीन सपाटीपासून दीडशे फूट खोल उत्खनन झालेले आहे. 

शहरात मोशी, चऱ्होली, चोविसावाडी या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दगड खाणी आहेत. त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उत्खनन सुरू आहे. काही जण अनधिकृतपणे उत्खनन करून क्रशर मशिन चालवीत आहेत. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. अनधिकृत क्रशरचालक, मालक आणि दगड, खडी, डबर, चुरा वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने अनेकदा कारवाई केलेली आहे. दंड आकारला आहे. अनेकदा केवळ कारवाईचा फार्सही केला जात आहे. त्यामुळे क्रशर व वाहनचालक मालकांना मोकळे रान मिळत आहे.

मात्र मोशी-चऱ्होली पट्ट्यातील उत्खनन प्रमाणापेक्षा झाले असल्याचे भूगर्भ तज्ज्ञांच्या निष्कर्षात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून येथील खाणीतून उत्खनन बंद करण्यात येणार असल्याचे खनिकर्म विभागाने गेल्या महिन्यात जाहीर केले. हा निर्णय लागू होण्यास केवळ साडेसहा महिने बाकी आहेत. शिवाय पावसाळ्यामुळेही उत्खननात अडथळे निर्माण होतील, या शक्‍यतेने रात्रं-दिन उत्खनन सुरू आहे. 

धोकादायक रस्ता
मोशी- गिलबिलेनगर परिसरात जमिनीच्या सपाटीपासून सुमारे दीडशे फूट खोलपर्यंत उत्खनन झालेले आहे. त्यामुळे मोठमोठ्या खाणी तयार झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेपर्यंतही उत्खनन केल्याने रस्ता रहदारीस धोकादायक झाला आहे. अशा आशयाचे सूचना फलकही महापालिकेने गिलबिलेनगरमध्ये लावले आहेत. तरीसुद्धा या रस्त्याने गौण खनिज वाहतूक करणारी वाहने धावत आहेत. 

दृष्टिक्षेपात खाणी व क्रशर
मोशी परिसरात एकूण २८ खाणी आणि १४ क्रशर होते. त्यापैकी नऊ खाणी आणि आठ क्रशर चालू असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात आठपेक्षाही अधिक क्रशर या भागात चालू असल्याचे ‘सकाळ’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले.  

तब्बल १५० फूट खोल उत्खनन
बंदीच्या निर्णयामुळे वेग

मोशी येथील खाणी या गायरान आणि खासगी जमिनीत आहेत. गायरान जमीन महापालिकेकडे हस्तांतरित केलेली असल्याने देखभालीची जबाबदारी त्यांची आहे. याबाबत महापालिकेला महिन्यापूर्वी पत्र पाठविले आहे. खासगी जमीन मालकालाही पत्र पाठविले आहे.
- संजय भोसले, नायब तहसीलदार

Web Title: Stone mining digging