बालविवाह व बालमजुरी थांबवा- भोर डीवायएसपींचा इशारा

संतोष शेंडेकर
रविवार, 10 जून 2018

सोमेश्वरनगर : "वंचित घटकातील मुलामुलींनाही शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे. पालकांनी अल्पवयीन मुलामुलींचे विवाह लावून देऊ नये. यामुळे मुलींचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. असे केल्यास पालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच मुलामुलींना बालमजुरीही करायला लावून शिक्षणापासून दूर ठेवू नका.", असा इशारा भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिला.

सोमेश्वरनगर : "वंचित घटकातील मुलामुलींनाही शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे. पालकांनी अल्पवयीन मुलामुलींचे विवाह लावून देऊ नये. यामुळे मुलींचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. असे केल्यास पालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच मुलामुलींना बालमजुरीही करायला लावून शिक्षणापासून दूर ठेवू नका.", असा इशारा भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिला.

नीरा व वाल्हे (ता. पुरंदर) येथील गोपाळ समाजाच्या वस्तीवरील शंभर शालेय मुलांना पुरंदर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दफ्तर, प्रत्येकी पाच वह्या, पाण्याच्या बाटली व अन्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच उपशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झालेल्या कृष्णा फडतरे यांचा तसेच दहावीत 91 टक्के गुण मिळविणाऱ्या ऊसतोड मजुराचा मुलगा सोमनाथ रंधवे याचा सत्कारही जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पोलिस फौजदार राजेश माळेगावे, उमेश कुदळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राहुल काळे, अजहर नदाफ, विकास सावंत व सोशल फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

पालकांना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, पुरंदर सोशल फाऊंडेशन अत्यंत वंचित आणि मागास घटकातील मुलांपर्यंत पोचले ही समाधानाची बाब आहे. मीही आश्रमशाळेतून शिकून पुढे आल्यामुळे गोपाळ (डोंबारी) समाजाच्या अडचणी काय असू शकतील याची कल्पना आहे. तरीही पालकांनी घरात भांडणतंटा टाळावा, चुकीच्या मार्गाला लागू नये. फक्त शिकवावे. या समाजात मध्यंतरी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने राजेश माळेगावे यांनी बालविवाह थांबविला ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु पालकांनीच मुले सज्ञान झाल्याशिवाय विवाह लावण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास आई-वडिलांवर गुन्हे दाखल केले जातील. याप्रसंगी कृष्णा फडतरे, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे, भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल चाचर यांनीही मनोगत व्यक्त केले. 

 बालमजुरी थांबणार?

चौथीनंतर पाचवीत प्रवेश घेताना गावातील मुलींचे व मुलांचे विद्यालय मोठी 'फी' वसूल करतात हे वास्तव मुलांशी चर्चा करताना कार्यकर्त्यांच्या समोर आले. वास्तविक शिक्षण हक्क अधिनियमानुसार कुठल्याही कारणास्तव फी घेणे गुन्हा असताना हे होत असल्याबद्दल कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच शाळांनी बाहेर फेकलेली मुले हॅाटेल, गोडावून, दुकाने यात 'स्वस्तात' काम करतात हे समजल्यावर अण्णासाहेब जाधव यांनी, मुलांना बालमजुरी करण्यास भाग पाडू नका असा इशारा दिला आहे. 

 

Web Title: stop child marriage and child labor said bhor dysp