भूगावात गावडे यांनी उभारली स्ट्रॉबेरीची बाग
बावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे आकर्षण बनत आहे.
भूगावमध्ये जमिनींना सध्या सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे या भागातील शेती दिवसेंदिवस कमी होऊन त्याठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तथापि माताळवाडी येथील माजी सरपंच मधुकर गावडे यांनी वडिलोपार्जित शेतीची परंपरा जोपासली आहे.

गावडे यांनी वीस गुंठ्यांमध्ये सेंद्रिय पद्धतीने मल्चिंगपेपर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा शेतीमध्ये आधुनिकतेचा उपयोग व्हावा या दृष्टीने गावडे वेगवेगळी पिके घेतात. स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणीही आहे. त्यामुळे एक वेगळा प्रयोग म्हणून सेंद्रिय स्ट्रॉबेरी करायचे त्यांनी ठरवले. याबाबत पुस्तके, इंटरनेटवरून या पिकाची माहिती घेतली. त्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यापासून ते पीक घेत आहेत.
सध्या शेतात स्ट्रॉबेरीची रसाळ तांबूस लाल फळे लगडलेली आहेत. त्यामुळे मुळशी, भूगाव, माताळवाडी, कोथरूड परिसरातील नागरिक स्ट्रॉबेरीची शेती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तसेच स्वतःच्या हाताने ताजी स्ट्रॉबेरी तोडून जिभेचे चोचलेही खवय्ये पुरवीत आहेत.
याबाबत गावडे म्हणाले की, सेंद्रिय पद्धतीने स्मार्ट शेती करण्याचा मानस आहे. त्यामुळे प्रथमच स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला. यामध्ये केवळ व्यापारी दृष्टिकोन नाही. तर नागरिकांना हिरव्यागार शेतीचा आनंद लुटता यावा, स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून ती खाण्याचा आस्वाद घेता यावा यासाठी वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या स्ट्रॉबेरीला कोथरूड, हडपसर, औंध, बाणेर या भागातील मॉलमध्ये मोठी मागणी आहे.
२० गुंठे स्ट्रॉबेरीचे एकूण क्षेत्र
१ लाख उत्पादन खर्च
२०० पर्यटक (दर शनिवार, रविवार) पर्यटकांची संख्या