भटक्‍या कुत्र्यांचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - शहरात भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांची संख्या एक ते दोन लाखांदरम्यान आहे. मात्र, महापालिका दरवर्षी केवळ दहा हजार कुत्र्यांवरच नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकते. कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

पुणे - शहरात भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांची संख्या एक ते दोन लाखांदरम्यान आहे. मात्र, महापालिका दरवर्षी केवळ दहा हजार कुत्र्यांवरच नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकते. कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या म्हणण्यानुसार भटक्‍या कुत्र्यांची संख्या ५० हजारांच्या आसपास आहे तर स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार ती संख्या एक ते दोन लाखांच्या दरम्यान आहे. यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीच्या शस्त्रक्रियेची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पुण्यात दरवर्षी १५ हजार नागरिकांना कुत्री चावल्याच्या घटना घडतात. सुदैवाने रेबीज या महाभयंकर रोगाने अजूनतरी डोके वर काढलेले नसले तरी, कुत्रे चावण्याच्या या मोठ्या प्रमाणाकडे पाहता भविष्यात या रोगाचे रुग्ण दिसू शकतील, अशी भीती व्यक्त होते.

भटक्‍या कुत्र्यांची संख्या रोखणे आव्हान
महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘भटक्‍या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी ६० लाखांच्या आसपास निधी मंजूर होतो. त्या माध्यमातून दरवर्षी १० हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्‍य होते. प्रत्येक कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येतो. त्यासाठी पालिका स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेते. यंदा पाच संस्थांनी निविदा भरली आहे. भटक्‍या कुत्र्यांची संख्या रोखणे हे आव्हान आहे. पुणे रेबीजमुक्त ठेवण्याचा प्रयत्न आहे.’’

महिन्यात हजार जणांना चावतात कुत्रे

शहरात दर महिन्याला एक हजार ते बाराशे नागरिकांना कुत्री चावल्याच्या घटना घडत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. ब्ल्यू क्रॉस सोसायटी, सोसायटी फॉर प्रोटेक्‍शन, पीपल्स फॉर ॲनिमल, सोसायटी फॉर प्रीव्हेशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पालिकेचे आरोग्य कर्मचारी भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करतात. कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत भटक्‍या आणि मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाते. जाळीच्या साहाय्याने पकडून कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. कायद्यानुसार त्यांना पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच सोडण्यात येते.

Web Title: stray dog in pune city