ताणतणावातून स्वच्छंदी आयुष्याकडे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे - आई-बाबांच्या रोजच्या भांडणाला सूरज (नाव बदलले आहे) कंटाळला होता... घरात राहणे त्याला नकोनकोसे वाटायचे... शाळेतही तो इतर मुलांशी वाद घालयाचा आणि सतत ताणतणावात राहायचा... त्याचे अभ्यासाकडेही लक्ष नव्हते... अशावेळी त्याला मदतीचा हात दिला तो ‘कनेक्‍टिंग संस्थे’च्या ‘पीयर एज्युकेटर्संनी’. त्याची मानसिक स्थिती समजून घेण्यासह त्याचे व त्याच्या पालकांचे समुपदेशन करून त्यांना सकारात्मक वाट दाखविण्याचे काम या संस्थेने केले आहे. त्यामुळे सूरज आता पुन्हा हसत-खेळत स्वच्छंदी आयुष्य जगतोय... हा बदल घडलाय ‘पीयर एज्युंकेटर्स’ म्हणून शाळांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींमुळे!

‘कनेक्‍टिंग’ या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या १३ वर्षांपासून शहरातील सहा शाळांमध्ये ‘पीयर एज्युकेटर्स’  हा प्रकल्प राबविला जात आहे. संस्थेचे प्रतिनिधी (पीयर एज्युकेटर्स) शाळांमध्ये जाऊन १३ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना मानसिक तणावापासून दूर सारत त्यांच्यात सकारात्मक जीवनशैली निर्माण करण्याचे काम करत आहेत. गप्पा, गोष्टी, गाणी आणि खेळांसह वेगवेगळ्या कलाकुसरीच्या उपक्रमांमधून, तसेच संवादात्मक कार्यक्रमातून त्यांच्यातील ताण दूर करण्याचे प्रयत्न हे प्रतिनिधी करत आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. आतापर्यंत सुमारे ४ हजार विद्यार्थी या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. 

याबाबत संस्थेचे समन्वयक विक्रमसिंह पवार म्हणाले, ‘‘एखाद्या मुलाला चित्र काढण्याची आवड असते, तर एखाद्याला गाण्याची... त्यांच्यामधील विविध आवडी जोपासत त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करणारे अनेक ॲक्‍टिव्हिटी संस्थेतर्फे राबविण्यात येत आहेत.

मुलांशी मनमोकळा संवाद
कौटुंबिक हिंसा, कलह, अभ्यासाचा वाढता ताण, मित्र-मैत्रिणींशी असलेला वाद, शाळेतील थट्टा-मस्करी अशा विविध समस्या प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांच्या या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांचे समुपदेशन करण्याचे कामही ‘पीयर एज्युकेटर्स’ करत आहे. १३ ते १६ वयोगटातील मुले वयात येत असल्यामुळे त्यांच्यातील समस्या खूप वेगळ्या असतात. त्या समजून घेऊन मैत्रीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे विक्रमसिंह पवार यांनी सांगितले.

वयात येताना शालेय विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण असतो. अभ्यासासह कौटुंबिक समस्येला ते वैतागतात. त्यांना या मानसिक कोलाहलातून दूर नेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. शाळांमधील समुपदेशकांशी आम्ही संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्याकडे मांडतो. तेही विद्यार्थ्यांचे प्रश्‍न समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा पालकांशी आणि इतर मुलांशी संवाद निर्माण करण्याचे कामही होत आहे. 
- विक्रमसिंह पवार, समन्वयक, कनेक्‍टिंग संस्था

Web Title: stress-free life