

Junnar Forest Fire Incident: Forest Department Acts Against Three Accused
esakal
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील खामगाव गावच्या हद्दीतील डोंगरावरील राखीव वनक्षेत्रात आग लावणाऱ्या युवकांवर वनविभागाकडून कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. वणवा लावणाऱ्या या युवकांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. करण हरीभाऊ पारधी, अक्षय संतोष जाधव यांसह अन्य तीन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान होळीच्या सणानंतर जुन्नर वनविभागाच्या हद्दीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर डोंगराला वणवे लावण्याच्या घटना घडतात. या घटनांमुळे वन्य संपदेचे अतोनात नुकसान होऊन त्या भागातील परिसंस्था नष्ट होत असते. या कारवाईमुळे वणवे लावणाऱ्या समाजकंटकांना चांगलाच चाप बसेल त्यामुळे वनविभागाच्या या कारवाईचे निसर्गप्रेमींकडून स्वागत केले जात आहे. तर वणवे लावणारे वनविभागाच्या रडारवर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.