पुण्यात शाळेत त्रास देतो म्हणून दुसरीतील विद्यार्थ्याला अमानुष शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - शाळेत त्रास देतो, म्हणून दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे वर्गशिक्षिकेने हात सुतळीने बांधून त्यास अमानुषपणे शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 1 नोव्हेंबर 2018 रोजी कोंढव्यातील एका नामांकीत शाळेत घडली. दरम्यान, विद्यार्थ्याला दिलेल्या या अमानुष शिक्षेचा जाब विचारणाऱ्या दुसऱ्या शिक्षकाला शाळेने कामावरून काढून टाकले. या प्रकाराची थेट केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. 

याप्रकरणी अनिकेत गुलाब सातव (वय 38, रा. सहकारनगर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध शिक्षण हक्क कायदा, बाल न्याय अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये खेळाचे शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. 1 नोव्हेंबर 2018 या दिवशी दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी खेळाच्या तासाला सकाळी पावणे नऊ वाजता मैदानात आली.त्यावेळी एका विद्यार्थ्याच्या हाताला सुतळी बांधलेली आढळून आली. फिर्यादी यांनी सुतळी सोडली, त्यानंतर विद्यार्थ्यास विचारणा केली, त्यावेळी वर्गशिक्षिकेनेच हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले. मधल्या सुट्टीनंतर फिर्यादी पुन्हा संबंधीत विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये गेले. त्यावेळी पुन्हा त्या विद्यार्थ्याचे हात सुतळीने बांधल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये मुलाचा फोटो काढून वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिकेस विचारणा केली. त्यावेळी विद्यार्थी त्रास देत असल्याने मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून त्याचे हात बांधल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या हाताची सुतळी सोडली. 

दरम्यान, शाळेने फिर्यादी यांना "तुमचे कराटे क्‍लास बंद करा, तुमच्या कराटे प्रशिक्षणाची गरज नाही' असे सांगत त्यांना कामावरून कमी केले. त्यानंतर फिर्यादी यांनी याविषयी 5 फेब्रुवारीला महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांना सविस्तर माहिती व ई-मेल पाठविला. संबंधीत मंत्रालयाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णू वाडकर हे करीत आहेत.

'दुसरीतील विद्यार्थ्याला शिक्षा करण्याचा हा प्रकार आहे. फिर्यादीनुसार "मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कुल' या शाळेच्या शिक्षिका व मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.''
- महादेव कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस ठाणे.

Web Title: Student Beating by Teacher Punishment Crime