JNU Attack : 'जेएनयू' हल्ल्याविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात शहरातील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याविरोधात शहरातील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. केंद्र सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करून पुणेकरांचे लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दरम्यान मंगळवारी सांयकाळी मोर्चा काढण्यात आला. "जेएनयू'तील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत आम्ही उभे आहोत, असा आशय असलेला मोठा कापडी फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींसह अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता.

डफली, हलगी घेऊन आलेल्या विद्यार्थांनी वादन घोषणाबाजी सुरू केली. "जो हिटलर की चाल चलेगा, ओ हिटलर की मौत मरेगा..', होश मे आवो होश मे आवो... मोदी सरकार होश मे आवो...', "इन्क्‍लाब जिंदाबाद...', "दहशत से आजादी, तानाशाही से आजादी...' यासह "सीएए', 'एनआरसी'ला विरोध करणाऱ्याही घोषणा विद्यार्थ्यांकडून दिल्या जात होत्या.

हातामध्ये सामाजिक सलोखा, बंधूभाव याचे संदेश देणारे फलक, तिरंगा, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग याचे फोटोही विद्यार्थींच्या हातामध्ये होते. वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेत चार ते पाच रांगांमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या दिशेने पायी चालण्यास सुरुवात केली. जवळपास एक किलोमीटर लांब या मोर्चाची रांग असल्याने वाहनचालकही याकडे उत्सुकतेने पाहत होते.

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

"पुण्यातील अनेक महाविद्यालयातील तरुण मोर्चात सहभागी झाले आहेत. हे उगीच गर्दीत आले नाहीत, तर यामागे देशातील सद्यस्थिती विरोधात आवाज उठविण्यासाठी एका विचाराने सर्वजण आले आहेत. जेएनयूमध्ये झालेला हल्ला भयानक होता. त्यातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.''

- विनय पंडीत, विद्यार्थी, पुणे विद्यापीठ

"सरकारच्या चुकीच्या धोरणांना आमचा विरोध आहेच, आमच्यावर हल्ला करून आम्ही घाबरू असे सरकारला वाटत असेल तर तसे होणार नाही. आमचे सरकारविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच राहील.''

- मधुरा जोशी, माजी विद्यार्थीनी, जेएनयू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Come Together for Protest JNU Attack