एसएससी बोर्डाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याला मनःस्ताप

गणेश बोरुडे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन : दहावीच्या पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकीमुळे तळेगाव दाभाडे येथील एका विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून,पुणे एसएससी बोर्डाने फेरतपासणीत चूक सुधारत वाढवून दिलेल्या ३ गुणांमुळे तोच विदयार्थी आता मावळ तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ-पुणे कार्यालयाचा गलथान कारभार मात्र यानिमित्ताने चव्हाटयावर आला आहे.

तळेगाव स्टेशन : दहावीच्या पेपर तपासणी दरम्यान झालेल्या चुकीमुळे तळेगाव दाभाडे येथील एका विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून,पुणे एसएससी बोर्डाने फेरतपासणीत चूक सुधारत वाढवून दिलेल्या ३ गुणांमुळे तोच विदयार्थी आता मावळ तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम आला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ-पुणे कार्यालयाचा गलथान कारभार मात्र यानिमित्ताने चव्हाटयावर आला आहे.

मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पुणे एसएससी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालात येथील सरस्वती विद्या मंदिरचा विदयार्थी पार्थ सचिन ढोबळे हा ९७.४० टक्के गुण मिळवून मावळ तालुक्यात तिसरा आला होता.मात्र,परीक्षेतील पेपर लिहिण्याच्या अंदाजानुसार तुलनेने कमी गुण मिळाल्याने, आजपावेतो सदा अव्वलस्थानी असणारा पार्थ नाराज झाला.एकूण सॊडविलेले प्रश्न पाहता विज्ञान आणि मराठीच्या गुंणाबद्दल त्याला शंका आली.त्यामुळे पुनर्तपासणी शुल्क भरुन उत्तरपत्रिका मागविल्या असता,पडताळणी दरम्यान एकेका ५ गुणांच्या प्रश्नाचे उत्तर परीक्षक आणि नियामक या दोघांनीही तपासले नसल्याचे निदर्शनास आले.शाळेतील संबंधित विषयाच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासली असता पार्थचे किमान १३ गुण वाढणे अपेक्षित होते.शाळेसह पालकांनी याबाबत बरेच दिवस बोर्डाकडे पाठपुरावा करुनही अखेर गेल्या ७ ऑगस्टला मराठीमध्ये १ आणि शास्त्र विषयात २ असे एकूण केवळ ३ गुण वाढल्याचे पत्र बोर्डाने हाती टेकवले.

तीन गुण वाढल्यामुळे निकालवेळी मावळ तालुक्यात तृतीय ठरविण्यात आलेला पार्थ आता ९८ टक्के गुणांवर तालुक्यात पहिला आला आहे.केवळ बोर्डाच्या गलथान कारभारामुळे पात्र असूनही निकालावेळी प्रथम येण्याच्या कौतुकास मुकल्याचे शल्य मात्र,पार्थसह त्याचे पालक शिक्षक यांना सलते आहे.आजकालची दशांश शताऊंश मार्कावर झुलणारी मेरिट लिस्ट पाहता त्याची शिक्षणाची संधी हुकण्याची देखील शक्यता होती. बोर्डाच्या चुकीमुळे पालकांसह शाळा व्यवस्थापनाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.गुण फेर तपासणीसाठी भरमसाठ फीसह अनेक हेलपाटे मारुनही चूक केलेल्या एसएससी पुणे बोर्ड व्यवस्थापनाकडून कसलेही सहकार्य मिळाले नाही, उलट मनःस्थाप सहन करावा लागल्याची भावना व्यक्त करत पार्थच्या पालकांसह शिक्षकांनी बोर्डाचा निषेध नोंदवला.

याबाबत प्रतिक्रियेसाठी एसएससी बोर्डाशी संपर्क होऊ शकला नाही.पार्थला प्रेरणा देण्यासाठी सरस्वती विद्या मंदिर संस्थेच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांच्यासह यशवंत प्रतिष्ठानतर्फे संविद पाटील,राजेश बारणे,राजेंद्र काटे,राजेंद्र कडलग आदींच्या हस्ते त्याचा स्वातंत्र्यदिनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: student face problem for ssc board fault