विद्यार्थ्यांना मिळाले करिअरचे पर्याय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कोरेगाव भीमा - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोरेगाव भीमा - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सुयश मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निरीक्षक अनिल गुंजाळ व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर यांनी विविध विद्याशाखा, उपशाखांची माहिती दिली. ‘सकाळ’ तसेच कोरेगाव भीमा येथील बातमीदार शरद पाबळे व वैशाली पाबळे, त्याचप्रमाणे पेरणेफाटा (ता. हवेली) येथील युनिव्हर्सल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संचालक दत्तात्रय राजेशिर्के व नीता राजेशिर्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. शरद पाबळे यांनी ५० व्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आमदार पाचर्णे यांनी कौतुक केले. योग्य वेळी मिळालेले मार्गदर्शन आयुष्याला चांगली कलाटणी देऊ शकते. त्यामुळे ‘सकाळ’चे हे मार्गदर्शक पाऊल अनेकांच्या यशाचे शिल्पकार ठरेल, असे पाचर्णे म्हणाले. गुंजाळ म्हणाले, ‘‘मुलांना टक्केवारीपेक्षा आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी पालकांनी पाठबळ द्यावे. महापुरुषांची चरित्रे वाचा, मात्र भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, जातीयता, व्यसनाधीनता व आत्महत्या करू नका.’’ वंदन नगरकर यांनीही विद्यार्थी व पालकांना प्रत्येकातील कलागुणानुसार करिअरचे विविध मार्ग सांगत विद्यार्थी ‘मार्क्‍स’वादी नको, तर ध्येयवादी करा, असे सांगितले. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही करिअर मार्गदर्शन ही महत्त्वाची बाब असल्याचे सांगत विद्यार्थीहिताकरिता या उपक्रमासाठी ‘सकाळ’ला सहकार्याची ग्वाही दिली. नारायणराव फडतरे यांनीही मार्गदर्शन केले.

या वेळी ‘युनिव्हर्सल’च्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला; तसेच ‘साप्ताहिक सकाळ’चा ‘करिअर गायडन्स विशेषांक’ विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आला. युनिव्हर्सलचे संचालक दत्तात्रय राजेशिर्के व नीता राजेशिर्के यांनी स्वागत केले. ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक योगेश निगडे यांनी प्रास्ताविक केले. मधुकर कंद व श्वेता काळुराम गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. शरद पाबळे यांनी आभार मानले.

...म्हणून वक्तृत्व कलेला गती
युनिव्हर्सल स्कूलने वक्तृत्वाची आवड जोपासण्यास पाठबळ दिले, तर ‘सकाळ’ वाचनाने व कौतुकाच्या बातम्यांनी प्रोत्साहन मिळाल्याची भावना श्रुती जमादार या विद्यार्थिनीने व्यक्त केली. वंदन नगरकर यांच्यासह उपस्थितांनी तिचे कौतुक केले.

Web Title: student free career option