दप्तरे मिळाली अन्‌ चेहरे फुलले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - शहरातील विद्यार्थ्यांच्या सुस्थितीतील जुन्या दप्तरांचा आणि शालेय साहित्याचा इतरांना उपयोग व्हावा, यासाठी त्यांच्याकडून गोळा करून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना ते देण्याचा उपक्रम नारायण पेठेतील योगेश तिवारी मित्र परिवाराने राबविला.

या उपक्रमांर्तगत मुळशी तालुक्‍यातील वाळेण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तेव्हा त्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलले. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्याच्या हेतूने त्या दप्तरामध्ये ज्या विद्यार्थ्याने ते दिले आहे, त्याचे नाव, पत्ता असलेली चिठ्ठी ठेवलेली होती. ती वाचून वाळेणच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या अनोख्या भेटीबद्दल या ‘ताई- दादां’ना पोस्ट कार्ड पाठवून त्यांचे आभार मानले. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे दप्तराऐवजी प्लॅस्टिकची पिशवी वा बारदान घेऊन शाळेत जावे लागते. तेव्हा त्यांना दप्तरे मिळावीत आणि शहरातील विद्यार्थ्यांनाही वापरलेले दप्तर आणि साहित्य इतर कुणाच्या उपयोगी पडू शकते, याची जाणीव व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे योगेश तिवारी यांनी सांगितले. यासाठी परीक्षित कान्हेकर, मधुर गेहलोत, विशाल सुगंधी आदींनी सहकार्य केले. या उपक्रमांतर्गत दप्तरे व शालेय साहित्य स्वीकारण्याची व्यवस्था नारायण पेठेतील निघोजकर मंगल कार्यालयात रविवारी (ता. ८) सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत केल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Web Title: student got school bags