‘प्रवेश फेऱ्या वाढवा, विद्यार्थ्यांची लूट नको’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

सीईटी सेलतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे - अभियांत्रिकी, फार्मसीच्या प्रवेशासाठी दोन फेऱ्यांनंतर संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवून, विद्यार्थी, पालकांची लूट केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सीईटी सेलने प्रवेशासाठी तिसरी, चौथी फेरी घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी यांनी सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्याकडे केली आहे. 

प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बुधवारी (ता. २०) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. सीईटी सेलतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये पहिली फेरी संपली असून, दुसऱ्या फेरीची प्रक्रिया गुरुवार (ता. २१) पासून सुरू होत आहे. पहिल्या फेरीत फक्त २० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.  त्यामुळे दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा तीव्र स्पर्धेला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच दुसऱ्या फेरीनंतर संस्था स्तरावर प्रवेश द्यावेत, असे परिपत्रक सीईटी सेलने दिले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रवेशाच्या फक्त दोनच फेऱ्या होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शासकीय कोट्यातून प्रवेश मिळेल की नाही याबाबत शाश्‍वती नाही. जर प्रवेश मिळाला नाही तर संस्था स्तरावर पूर्ण शुल्क भरून, डोनेशन देण्याची नामुष्की येणार आहे. तसेच शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार नाही. 

कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती गंभीर असताना प्रवेशाच्या दोनच फेऱ्या घेणे अन्यायकारक आहे. संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविल्याने पालकांना वेठीस धरून, जादा शुल्क आकारणे, गुणवत्ता डावलून प्रवेश होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि सरकारचीही फसवणूक होणार आहे. त्यामुळे सीईटी सेलने प्रवेशाची तिसरी, चौथी फेरी घेण्यात यावी, असे साळी यांनी सांगितले. 

हे वाचा - Serum Institute Fire: आग लागली की लावली; घटनेच्या चौकशीची मागणी

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना विना सीईटी अभियांत्रिकीला प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नागरी कृती समितीतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, अभिजित महामुनी, शैलेश बडदे, प्रशांत गांधी, अजिंक्‍य पालकर आदी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student need more admission round shivsena demand cet cell