विद्यार्थ्यांनी तयार केल्या शाडूच्या गणपतींच्या मूर्ती

baramati
baramati

बारामती (पुणे) : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आज बारामतीतील अनेक शाळातील विद्यार्थ्यांच्या हातांनी शाडूच्या मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून होणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्याचा संकल्प केला.

येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याची महाकार्यशाळा आज म.ए.सो. विद्यालयाच्या मैदानावर झाली. शहरातील पंधरा शाळातील दोन हजारांवर विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारल्या तर काहींनी मूर्तीला रंगरंगोटी करुन सुंदर मूर्ती घडविली. नवनिर्मितीचा आनंद आणि सृजनशीलतेचा अनोखा मिलाफ या कार्यशाळेच्या निमित्ताने आज दिसला. 

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना पर्याय म्हणून शाळातून विद्यार्थ्यांच्या हातून गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी चार वर्षांपूर्वी मांडली व तिला मूर्त स्वरुप दिले. दरवर्षी किमान दोन हजारांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या कमी झाल्या असून प्रदूषण कमी करण्यात फोरमला यश मिळाले आहे. 

प्रत्येक शाळातून विद्यार्थ्यांनी कलाशिक्षकांच्या सहाय्याने या मूर्ती साकारल्या, यात नवनिर्मितीचा आनंद तर होताच पण स्वताः मूर्ती घडविल्याने त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संबंधित विद्यार्थ्यांच्या घरात होत असल्याने पर्यावरणाचा संदेश हजारो कुटुंबात या निमित्ताने पोहोचल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. 

आज सकाळपासूनच अनेक विद्यार्थ्यांच्या हातातून साकारलेल्या सुंदर मूर्त्या पाहून इतरही विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती साकारण्याची प्रेरणा मिळत होती. दरवर्षी शाडूच्या मातीच्या मूर्त्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न फोरमच्या माध्यमातून केला जात असून त्याला सर्वच शाळांचा सक्रीय पाठिंबा प्राप्त होतो आहे. 

बारामतीत गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या चळवळीचे स्वरुप व्यापक होत असून मुले उत्स्फूर्तपणे आता मूर्ती बनवित असल्याचेही आज दिसून आले. गणेशमूर्तीं साच्याविनाही काही विद्यार्थ्यांनी साकारण्याचा सुंदर प्रयत्न दिसला. 

असंख्य कुटुंबांनी इकोफ्रेंडली मूर्त्यांची संकल्पना स्विकारली
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी इकोफ्रेंडली मूर्ती मुलांच्या हातून तयार करण्यास प्रारंभ केला आणि आपोआपच शहरातील अनेक कुटुंबांच्या घरात याच मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा होऊ लागल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर आपोआपच घटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com