विद्यार्थ्यांना अनामत ठेव परत देण्याकडे काणाडोळा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

#PuneStudents
- विद्यार्थ्यांनी याबाबत आपले अनुभव कळवावेत.. फेसबुक आणि ट्विटरवर
- ई मेल करा webeditor@esakal.com वर

पुणे : महाविद्यालयात पूर्ण शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. ग्रंथालयातील पुस्तक जमा न केल्यास निकाल मिळत नाही. कॉलेजमधून स्थलांतर दाखला (टीसी) हवे असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडे काही रक्कम बाकी नाही ना, हे काटेकोरपणे पाहिले जाते; परंतु प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी अनामत ठेव म्हणजेच "डिपॉझिट' विद्यार्थ्याला परत केले जात नसल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. 

जनता दल युनायटेडचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी माहितीच्या अधिकारात गेल्या काही वर्षांत किती विद्यार्थ्यांना डिपॉझिट देण्यात आले, याची माहिती मागवली. आंबेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय आणि गरवारे महाविद्यालयाकडून ही माहिती मागविली होती. त्यात जवळपास हजारो विद्यार्थ्यांना गेल्या एक-दोन वर्षांत डिपॉझिट देण्यात आले नसून, ही रक्कम जवळपास लाखो रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. 

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची जवळपास 10 लाख रुपये अनामत ठेव परत करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. गरवारे महाविद्यालयात 2015-16, 2016-17 या शैक्षणिक वर्षातील बीए आणि बीएस्सीच्या जवळपास 520 विद्यार्थ्यांची एकूण चार लाख 74 हजार 100 रुपयांची अनामत ठेव विद्यार्थ्यांना दिली नाही. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयातील 2015-16 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षांमध्ये नऊ लाख 66 हजार अनामत ठेव विद्यार्थ्यांना दिली नाही, अशी माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांना परत न केलेल्या अनामत ठेवीबाबत फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र परदेशी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अनामत ठेव परत मिळावी, यासाठी दावा करत नाहीत. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी ही ठेव परत घ्यावी, यासाठी महाविद्यालयांमध्ये नोटीस लावण्यात येते; परंतु बहुतांश विद्यार्थी ही ठेव घेण्यासाठी येत नाहीत. 
- डॉ. मुक्तजा मठकरी, प्राचार्य, गरवारे महाविद्यालय 

कल्याणकारी योजनेसाठी वापर 
विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीत अनामत ठेव परत न घेतल्यास ही रक्कम विद्यार्थ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरली जाते. अनामत ठेवीच्या रकमेचा वापर कोणत्याही इतर कामासाठी करत नाही, असे विद्यापीठाच्या माध्यम समन्वय कक्षाचे विशेष कार्याधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितले. 

#PuneStudents
- विद्यार्थ्यांनी याबाबत आपले अनुभव कळवावेत.. फेसबुक आणि ट्विटरवर
- ई मेल करा webeditor@esakal.com वर

Web Title: students deposit issue in Pune University