#Education ‘कौशल्य सेतू’

#Education ‘कौशल्य सेतू’

पुणे - दहावीच्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवरील नापासाचा शिक्का पुसण्यासाठी ‘कौशल्य सेतू’चा पर्याय दिला आहे. त्याचा २२२ विद्यार्थ्यांना लाभ झाला आणि त्यांना राज्य शिक्षण मंडळाने दहावी उत्तीर्ण असे प्रमाणपत्रही दिले आहे. हे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेऊ शकतील. आता मंडळाने या योजनेचा लाभ देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुन्हा अर्ज मागविले आहेत. 

नापास हा शिक्का पुसण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने फेरपरीक्षेचा पर्याय उपलब्ध करून दिला. यातून अनेक विद्यार्थ्यांचे एक शालेय वर्ष वाचले. पण फेरपरीक्षेतही अनेकजण अनुत्तीर्ण होत असल्याने त्यांना कौशल्य अभ्यासक्रमाकडे वळविले. तीन ते सहा महिन्यांचे हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांवरील नापासाचा शिक्का पुसण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचे ‘ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट’चा लाभ दिला आहे.

फेरपरीक्षेत तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्यातील दोन विषयांत ‘ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट’ देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. म्हणजे दहावी पास हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्याला एकच विषय द्यावा लागेल. दुसऱ्या स्थितीत, जर विद्यार्थ्याचे दहावीला चार विषय राहिले असतील आणि त्याने कौशल्य सेतूचे अभ्यासक्रम पूर्ण करताना दहावीची परीक्षा देऊन दोन विषय सोडविले असतील, तर त्या विद्यार्थ्याला ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ देऊन उर्वरित दोन विषयांत उत्तीर्ण केले जाते.

राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, ‘‘मंडळाने जुलै २०१८ पासून २४२ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला. यातील १४९ विद्यार्थ्यांना दहावी पास प्रमाणपत्र दिले. ज्यांचे दोन विषय अनुत्तीर्ण राहिले, त्या ७३ जणांना एटीकेटी योजनेचा लाभ दिला. ज्यांचे दोनहून अधिक विषय राहिले असतील, त्यांना एकच विषयाची परीक्षा द्यावी लागेल. यातून दहावी उत्तीर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.’’

पुन्हा संधी
कौशल्य सेतूचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट’ मिळविण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे. त्यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित अर्जाची प्रिंट काढून, तो अचूकपणे भरावा. त्यासोबत शुल्क भरून अर्ज १५ मेपर्यंत विभागीय मंडळाकडे संबंधित शाळेमार्फत सादर करायचा आहे. त्याबरोबर विद्यार्थ्याने दिलेल्या दहावी परीक्षांच्या गुणपत्रिका जोडणे अनिवार्य आहे, असे डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com