यू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी 

यू-ट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी 

पुणे : शिक्षणाबरोबरच कलेची आवड जोपासत महिन्यातील 10 ते 12 दिवस काम करून शहरातील दोन तरुण "यू-ट्यूब'च्या माध्यमातून 15 ते 20 हजार रुपये कमावत आहेत. त्यातील सुमारे 25 टक्के भाग समाजकार्यासाठी खर्चून त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या पायांवर उभे राहून शिक्षण घेण्याचा या तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. 

न्यू लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या आदित्य सातपुते याने सामाजिक प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी "वी राइज बाय लिफ्टिंग अदर्स' या चॅनेलची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निर्मिती केली. युवकांच्या जीवनशैलीवर आधारित मनोरंजनाच्या व्हिडिओसह गरजू व्यक्तींचे, असे 10 व्हिडिओ दर महिन्याला या चॅनेलवर प्रदर्शित केले जातात. यातील पाच व्हिडिओ वंचित मुलांचे असून, त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले जाते. मिळणाऱ्या उत्पन्नातून वंचित मुलांना मदत केली जाते व शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन गरिबांना ब्लॅंकेटवाटप, जेवण असे सामाजिक उपक्रमदेखील राबविले जातात. या पद्धतीने त्याने आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींना सुमारे दीड लाख रुपयांची मदत केली आहे. त्या पुढे जाऊन गरजू लोकांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी त्याने एक वेबसाइटसुद्धा सुरू केली आहे. अवघ्या 16 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या त्याच्या या चॅनेलला आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी "सबस्क्राइब' करून पाठिंबा दर्शविला आहे. 

गरवारे महाविद्यालयात जनसंज्ञापन शाखेच्या पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या शुभम कुलकर्णी याने "पुणे पॉडकास्ट' या यू-ट्यूब चॅनेलची निर्मिती गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली. बदलत चाललेल्या व्याख्येतून मनोरंजनाचा मूळ गाभा कुठेतरी हरवत चाललेला आहे. त्यावर भाष्य करण्यासाठी शुभमने हे चॅनेल सुरू केले. प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर, आशयावर चर्चा करणे हा या चॅनेलचा मुख्य उद्देश आहे. बदलत गेलेल्या मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल आणि त्यावर विविध तज्ज्ञांचे मत या गोष्टींवरही "पॉड-कास्ट'वर चर्चा केली जाते.

आतापर्यंत यात सॅक्रेड गेम्स (वेब सीरिज), ची. व सौ. कां, गुलाबजाम, फर्जंद यांसारख्या चित्रपटांवर चर्चा करण्यात आली आहे. अनेक नामवंत कलाकारांनी यात सहभाग घेतला होता अन्‌ त्यालाही आतापर्यंत सुमारे सात हजार सबस्कायब्रर मिळाले आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शुभमही काही भाग सामाजिक कामासाठी खर्च करत आहे. 

चित्रपट निर्मितीचा मानस 

शिक्षण पूर्ण करतानाच आदित्य व शुभम महिन्यातील 10-12 दिवस काम करून 15-20 हजार रुपये कमावतात. त्यांच्या या उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शुभमलाही हुरूप आला असून "पॉडकास्ट'वर' मर्यादित न राहता आता चित्रपट निर्मितीमध्येही उतरण्याचे त्याने ठरविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com