वसतिगृह नियमावलीस विद्यार्थ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहासंबंधी नव्याने केलेल्या नियमावलीस विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. विद्यापीठातील ग्रंथालयाचा वाचन कक्ष रात्री बारा वाजता बंद होतो आणि वसतिगृह रात्री साडेदहा वाजता बंद होणार आहे. मग, विद्यार्थ्यांनी जादा वेळ अभ्यास करायचा नाही का, असा प्रश्‍न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पूर्वपरवानगीने उशिरा येण्याची मुभा नियमावलीत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहासंबंधी नव्याने केलेल्या नियमावलीस विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. विद्यापीठातील ग्रंथालयाचा वाचन कक्ष रात्री बारा वाजता बंद होतो आणि वसतिगृह रात्री साडेदहा वाजता बंद होणार आहे. मग, विद्यार्थ्यांनी जादा वेळ अभ्यास करायचा नाही का, असा प्रश्‍न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पूर्वपरवानगीने उशिरा येण्याची मुभा नियमावलीत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
 
विद्यापीठाने तयार केलेल्या नियमावलीवरून राजकीय पक्षदेखील आता सरसावले आहेत. त्यातच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल (ता. 29) भूमिका स्पष्ट केली असून, विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका विद्यापीठाबाहेर मांडाव्यात. प्रश्‍नांसाठी आंदोलने त्यांनी जरूर करावीत; परंतु पक्षीय प्रचार करू नये, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या नियमावलीबाबत विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता, त्यांनी काही अटींबाबत आक्षेप नोंदविले. 

वसतिगृह आणि भोजनासंबंधीच्या अडचणींवर आवाज उठविण्यासाठी काही वेळेस विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते. अशा अध्यादेशाद्वारे विद्यापीठ एकप्रकारे व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीच करीत आहे. तसेच, जयकर ग्रंथालयाचा वाचन कक्ष रात्री बारा वाजता बंद होतो आणि अध्यादेशात वसतिगृहात येण्यासाठी रात्री साडेदहाचे बंधन घातले आहे. 
- नीलेश आंबरे, विद्यार्थी 

हमीपत्रात सरकारविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी व्हायचे नाही, असे म्हटले आहे. या तथाकथित विरोधी कारवाया नक्की कोणत्या? हे विद्यापीठाने नमूद केलेले नाही. हा एकप्रकारे विद्यार्थ्यांवरील अविश्‍वास असून, विद्यापीठ विद्यार्थ्यांना राजकीय व्यासपीठापासून दूर ठेवत आहे. 
- अंकिता आपटे, विद्यार्थिनी 

सरकार आणि विद्यापीठाच्या विरोधात बोलायचे नाही, असे हमीपत्रात म्हटले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी चळवळीवर घाव घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. वसतिगृहात छायाचित्रे काढायची नाहीत, अशी विचित्र अट यात घालण्यात आली आहे. एकप्रकारे एकाधिकारशाही निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. 
- सचिन लांबुटे, विद्यार्थी 

मुळात विद्यार्थ्यांकडून कोणतेही हमीपत्र लिहून घेणे चुकीचे आहे. विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारची बंधने लादून आमच्या स्वातंत्र्यावरच गदा आणत आहे. या हमीपत्रामुळे राजकीय नेतृत्वाची पुढची पिढी निर्माण करण्यावरच बंदी घातली आहे. 
- नालंदा घाटगे, विद्यार्थिनी 

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विद्यापीठाने नियमावली तयार केली आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहात उशिरा यायचे असेल, तर पूर्वपरवागी घेण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्याला दररोज जादा अभ्यासासाठी ग्रंथालयातून परतण्यास विलंब होणार असेल, तर संबंधित विभागप्रमुखाची शिफारस विद्यार्थ्याने दिल्यास त्यास परवानगी दिली जाईल. 
- डॉ. सचिन बल्लाळ, मुख्य वसतिगृह प्रमुख, पुणे विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students oppose to Hostel Regulation