विद्यार्थी म्हणतात 'एमसीक्यू' करणार घात; प्रश्न कसे अन् कोणत्या अभ्यासक्रमावर येणार?

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 6 September 2020

- प्रश्न कसे येणार? कोणत्या अभ्यासक्रमावर येणार?
- निकालावर परिणाम होण्याची भीती
- विद्यापीठाकडून स्पष्टता आवश्यक

पुणे : पदवीची गुणवत्ता राखण्यासाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. पण आत्तापर्यंत सर्व तयारी दीर्घोत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने केलेली आहे. एमसीक्यू परीक्षेसाठी प्रश्न संच उपलब्ध नाहीत, प्रश्न कसे विचारले जातील याचा अंदाज नाही. मग एवढ्या असे कमी वेळात नव्या परीक्षा पद्धतीची तयारी करायची कशी? विद्यापीठांनी यावर स्पष्टता गरजेचे आहे, अन्यथा या परीक्षेत आमचा घात होणार या चिंतेने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी एमसीक्यू पद्धतीने अंतिम वर्ष परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.

बीएससी तृतीय वर्षातील प्रीतम वाकलकर म्हणाला, "परीक्षा झाली पाहिजे पण माझ्या कॉम्प्युटर सायन्स या विषयाचे प्रश्न एमसीक्यू मध्ये कसे विचारणार ? त्याची तयारी कशी करायची हे मला कळत नाही. हा प्रश्न इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनी पडलेला आहे. दिलेल्या पर्यायांमधून उत्तर शोधण्यासाठी आकडेमोड करणे, विचार करणे यासाठी वेळ लागणार. त्यामुळे पन्नास प्रशांसाठी एक तास कमी पडणार असल्याने परीक्षा वेळ वाढवला पाहिजे. यावर पुणे विद्यापीठाने याचा विचार करावा." 

"तिसऱ्या वर्षात तीन प्रकारचे अकाऊंटचे विषय आहेत. यामध्ये आम्ही प्रोब्लेम सोडवतो. आता एमसीक्यू पद्धतीने यावर कसे प्रश्न विचारणार हे कळत नाही. एमसीक्यूचा अभ्यास करण्यासाठी प्रश्न संच उपलब्ध नाहीत. मग आम्ही परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न उपस्थित करत अक्षय जिरे याने उपस्थित केला. 

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिकणारा लहू डोंगरे म्हणाला, "आमच्या महाविद्यालयाने ऑनलाईन एमसीक्यू परीक्षा होणार असून तयारीला लागा असे सांगितले. पण परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत कोणीही काही सांगत नाही."
तर काही विद्यार्थ्यांनी जेईई, नीटची परीक्षा देणारे विद्यार्थी या एमसीक्यूची तयारी करतात. त्यामुळे त्यांच्याशी आमची तुलना करणे योग्य नाही", असे मत व्यक्त केले आहे

एमसीक्यू पद्धतीने परीक्षा होणार म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये तुम्हाला जो अभ्यासक्रम शिकवला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. प्रश्नांची संख्या ही योग्य असेल, पुणे विद्यापीठाने यापूर्वी एमबीए आणि इंजिनीअरिंगची एमसीक्यू परीक्षा घेतली आहे. त्यामुळे हा अनुभव पाहता विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठ घेईल. - डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा

सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या
- अभ्यासक्रम कोणता हे जाहीर करा 
- क्रेडिट सिस्टीममध्ये याचे मूल्यमापन कसे होणार
- इतर राज्यांप्रमाणे असाइनमेंट बेस परीक्षा घ्या
- आॅनलाईनच परीक्षा घ्यायची होती तर सहा महिने वाया का घातले याचे उत्तर द्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students say on Social media abou MCQ questions in Exam