सासू- सुनेचा रंगला कलगीतुरा 

सु, ल. खुटवड
Monday, 25 January 2021

‘‘अगं बाई ! सासूशी असं कोणी बोलतं का? आमच्यावेळी असं नव्हतं बाई. सासूबाईंचा मला किती धाक असायचा. पदर खाली पडला तरी त्या डोळे वटारून बघायच्या. इथं सगळं उलटंच.’’ 

आज सकाळी चहा उशिरा मिळाल्याने सासूबाईंचा रागाचा पारा चढला. ‘‘अगं चहा देणार आहेस की नाही ते तरी सांग. नाहीतर शेजारी जाऊन पिऊन येते.’’ सासूबाईंनी फोडणी टाकली. 

‘‘तुम्हाला शेजारी जाऊन माझी बदनामी करण्यासाठी बहाणाच पाहिजे असेल तर खुशाल जा. पण मी म्हणते दरवेळी तेच तेच बोलण्यात तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हो आणि त्यांनाही तेच तेच ऐकण्यात कसला इंटरेस्ट असतो कोणास ठाऊक?’’ सूनबाईंनेही जशास तसे उत्तर दिले. 

‘‘दोन वषार्पासून माझे गुडघे दुखायला लागले म्हणून स्वयंपाकघरात मी लक्ष घालत नाही, तर केवढा आकांडतांडव करतेस.’’ 

‘‘लेकीकडे जायचा विषय काढा की दहा मजले चढून वर जाताल वर त्यांच्या घरातील सगळी कामे एका दमात कराल. त्याचवेळी कोठे जाते तुमची गुडगेदुखी आणि कंबरदुखी़’’ 

‘‘माझी लेक एकटी संसाराचा गाडा ओढते. त्यामुळे तिला मदत करणे माझे कामच आहे. ’’ 

‘‘आणि इकडे माझ्या हाताखाली दहा माणसे आहेत का?. सकाळी मी सगळ्यांचा स्वयंपाक करून, दोघांचा डबा करायचा आणि पळत पळत आॅफिस गाठायचे. तेथून आल्यानंतर कामाचा रगाडा आहेच. तुमची काडीची मदत होते का?’’ 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

‘‘डोंबलाचा कामाचा रगाडा असतो. सारखं तर फेसबुक आणि व्हॉटसअपवर तर असतेस. उरलेल्या वेळेत माहेरच्या माणसांशी गप्पा मारतेस. आता हेच पहा. काय भांडी घासतेस? ताट घासल्यावर जेवताना त्यात आपलं तोंड दिसलं पाहिजे, इतकं लख्ख ताट घासलं पाहिजे.’’ 

‘‘जेवताना आरशात तोंड पहायची इच्छा असेल तर तुम्हाला ताट हवंय कशाला? खुशाल आरशावरच जेवत जा की.’’ 

‘‘अगं बाई ! सासूशी असं कोणी बोलतं का? आमच्यावेळी असं नव्हतं बाई. सासूबाईंचा मला किती धाक असायचा. पदर खाली पडला तरी त्या डोळे वटारून बघायच्या. इथं सगळं उलटंच.’’ 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

‘‘काळाप्रमाणे तुम्ही नको का बदलायला. सारखं आपलं त्या सासू- सुनांच्या भांडणाच्या मालिका बघायच्या. सासू सुनेचा कसा छळ करते? याच्या आयडिया तुम्हाला अशा मालिकांमधून तर मिळतात.’’ 

‘‘अगं वेळ जात म्हणून मी टीव्ही बघते तर माझ्यावर वाट्टेल ते आरोप करतेस का़? चोवीस तास तू मोबाईलला चिकटून बसलेली असतेस. त्यामुळे मी तुला काही बोलते का? माझ्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं.’’ 

‘‘सतत टोमणे मारणारी सासू मिळणं, याला खरंच भाग्य लागतं. गेल्या जन्मी मी काही तरी पुण्य केले असेल म्हणून त्याचं फळ म्हणून मला अशी सासू मिळाली आहे.’’ 

‘‘तुला माझ्याशी भांडायला तासभर वेळ आहे पण मला चहा द्यायला वेळ नाही. ’’ 

‘‘एवढ्या वेळात तुम्ही स्वतः चहा केला असता. तुम्हीही पिला असता आणि मलाही दिला असता. पण तुम्हाला सगळं आयतं पाहिजेल.’’ 

ऐतखाऊ कोणाला म्हणतेस गं.’’ असे म्हणून सासूबाई तरातरा स्वयंपाकघरात गेल्या. 

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​

‘‘अहो, आता तर तुम्हाला गुडघेदुखी व कंबरदुखीने जाग्यावरून उठता येत नव्हतं ना.’’ 

त्यावर सासूबाईंनी गुडघे धरले. ‘‘आई गं ! तुझीच दृष्टच लागली माझ्या गुडघ्यांना. लागले परत दुखायला. तुझा चहा नकोच मला.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SU L khutwad write article about Mother-in-law and daughter-in-law

Tags
टॉपिकस
Topic Tags: