
लग्नानंतर पुरुषांचे बाहेर जेवणे वा पार्ट्यात रमणे हे कमी होत नाही. मात्र, बाहेरून तुडुंब जेवून आल्यानंतरही घरी बायकोच्या भीतीने पुन्हा जेवावेच लागते. त्यामुळे पुरुषांचे पोट सुटेल नाही तर काय होईल?
आमच्यासकट सगळेच पुरूष लग्नाआधी सडपातळ असतात. मात्र, लग्न झाल्यानंतरच त्यांना काही महिन्यांतच पोट सुटते. यामागे व्यायामाचा आळस वगैरे कोणतेही कारण नसून बायकोची वाटणारी भीती हेच एकमेव कारण आहे, असा निष्कर्ष आम्ही संशोधनाअंती काढला आहे. कारण लग्नानंतर पुरुषांचे बाहेर जेवणे वा पार्ट्यात रमणे हे कमी होत नाही. मात्र, बाहेरून तुडुंब जेवून आल्यानंतरही घरी बायकोच्या भीतीने पुन्हा जेवावेच लागते. त्यामुळे पुरुषांचे पोट सुटेल नाही तर काय होईल?
राज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर
लग्नाआधी आम्हीही सडपातळ होतो. अनेकजण आमची तुलना दुधी भोपळ्याशी करायचे. मात्र, काही वर्षातच आमची तुलना लाल भोपळ्याशी होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. अजूनही जुने दिवस आठवले, की आम्ही फक्त उसासे टाकतो. आजही तो दिवस आठवतो. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी बायकोने आम्हाला लवकर घरी बोलावले. घरी तिने काश्मिरी पुलाव, पनीर मसाला, कांद्याची भजी, भरलेल्या वांग्याची भाजी आणि रायता बनवला होता. त्याचबरोबर मसाला पापड वगैरे असले पदार्थ दिमतीला होतेच. लवकर घरी या, असा आग्रह तिने धरला होता. आम्हीही त्याला होकार दिला होता. आम्ही सायंकाळी सहाच्या सुमारास घरी जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात आमचा मित्र समीरचा फोन आला. त्याने धीरजच्या ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. मी त्याला नकार कळवला. मात्र, काही खाऊ- पिऊ नकोस. थोडा वेळ थांब आणि लगेचच निघ, असे त्याने सांगितल्याने आमचाही नाईलाज झाला. तिथे गेल्यानंतर धीरजला समजावून सांगण्यातच दोन तास कसे गेले, ते कळलेच नाही. थोडे सांत्वन केले, की लगेचच तो तिच्या आठवणीत रमायचा. आम्ही निघायला लागलो की लहान मुलासारखा मोठ्याने रडायचा. त्यातच एकीकडे मद्यपानही सुरू असायचे. त्यामुळे त्याला बरं वाटावं म्हणून आम्हीही थोडं मदिरापान आणि मटण बिर्याणी खाल्ली. मात्र, पुढच्या तासाभरात याचे प्रमाण वाढू लागले. बायकोचा वारंवार फोन येत होता. मात्र, आम्ही `आलोच पाच मिनिटांत़’, ‘आलोच दहा मिनिटांत’ असेच आमचे चालू होते. शेवटी रात्री साडेदहाच्या सुमारास धीरजसह सगळ्या मित्रांचा नाईलाजास्तव निरोप घेतला व रात्री अकराच्या सुमारास घरी पोचलो. उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली. बायको थोडी रागावली. मात्र, तिनेही समजून घेतले. त्यानंतर पाच मिनिटांतच तिने आमच्यासाठी सगळे जेवण गरम केले व दोन भरगच्च ताट घेऊन ती दिवाणखान्यात आली. ‘‘लग्नाचा वाढदिवस म्हणून तुम्हाला आवडतात, त्या सगळ्या भाज्या मी केल्या आहेत. तुमच्यासाठी मी जेवायची थांबली आहे. करा सुरवात.’’ असे ती म्हणाली. त्यावेळी आमचे पोट गच्च भरले असूनही पोटात गोळा आला. आम्ही तिला ब्रेकअप पार्टीत प्रमाणाबाहेर जेवल्याचे सांगितले. त्यामुळे आता पोटात कणभरही जागा नाही. त्यामुळे तू एकटीने जेवून घे, असे सांगितले. त्यावर मात्र तिने रणचंडिकेचा अवतार धारण केला. आमची चांगलीच बिनपाण्याने केली. लाटण्याचा उपयोग केवळ पोळ्या लाटण्यासाठीच होतो, हे खरं नाही. त्याचा उपयोग डोक्यात मारण्यासाठीही होतो, याची जाणीव आम्हाला त्याच दिवशी झाली. तेव्हापासून आम्ही कानाला खडा लावला. बाहेरून कितीही जेवून आलो, तरीही बायकोच्या समाधानासाठी व भांडणे टाळण्यासाठी आम्ही घरीही दणकून जेवतो. आता तुम्हीच सांगा ! आठवड्यातून असं तीन- चार वेळा होत असेल तर आमचे पोट सुटणार नाही तर काय होईल?
राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा