हिंडतो त्यांच्याबरोबर मत तुम्हालाच....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंडतो त्यांच्याबरोबर मत तुम्हालाच....!

‘‘तुम्हाला आताच सांगतो, लिहून ठेवा. तुम्हीच शंभर टक्के निवडून येणार. फक्त खर्चाला मागे- पुढे पाहू नका.’’ असे दिनुकाकाने म्हटल्यावर सतीशरावांनी खिशात हात घातला व पाचशे- पाचशेच्या पाच-सहा नोटा दोघांच्या हातात ठेवल्या.

हिंडतो त्यांच्याबरोबर मत तुम्हालाच....!

‘‘आम्ही फक्त त्यांच्याबरोबर हिंडतोय, मतदान मात्र तुम्हालाच करणार आहे,’’ ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी गटाबरोबर मेतकुट जमलेल्या दिनुकाका व त्याच्या मित्राचे हे वाक्‍य ऐकून उमेदवार सतीशनानांचा हुरूप एकदम वाढला. ‘‘तुम्हाला आताच सांगतो, लिहून ठेवा. तुम्हीच शंभर टक्के निवडून येणार. फक्त खर्चाला मागे- पुढे पाहू नका.’’ असे दिनुकाकाने म्हटल्यावर सतीशरावांनी खिशात हात घातला व पाचशे- पाचशेच्या पाच-सहा नोटा दोघांच्या हातात ठेवल्या.

धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा​

‘सतीशनाना, समोरची पार्टी पाण्यासारखी दारू ओततेय.’ असे म्हटल्यावर सतीशनानांनी खंब्याची पिशवीच त्यांच्या हातात ठेवली. ‘बरं आता येऊ का? त्यांच्या गोटात शिरून मला सगळी माहिती काढावी लागते,’ असे म्हणून दिनुकाका गाडीला किक मारून सुसाट गेला. सतीशनाना पुढे गेल्यानंतर चार-पाच मतदारांचा घोळका दिसला. नानांना पाहून सगळेजण रांगेत उभे राहिले व विठ्ठलासारखे कंबरेवर हात ठेवून नानांना दर्शन देऊ लागले. कधीही आणि कोणापुढेही न झुकणारा नाना दिवसांतून शंभरवेळा तरी मतदारांच्या पाया पडण्यासाठी या पद्धतीने वाकू लागले. थोडे पुढे गेल्यानंतर झोकांड्या खात असलेला संतुमामा दिसला. ‘माझ्याकडे तीस मते आहेत. ही मंडळी माझ्या शब्दाबाहेर नाहीत. ही एकगठ्ठा मते तुम्हालाच देणार आहे.’ संतुमामाने म्हटले. ‘अहो, काल हेच वाक्‍य तुम्ही विरोधी गटाला म्हणालात ना.’ नानाच्या कार्यकत्याने म्हटले. ‘त्यावेळी मी दारू पिलो होतो का? माणूस दारू पिल्यावर खरं बोलतो, हे लक्षात ठेवा.’ संतुमामाने असं म्हटल्यावर नानाने पाच हजारांचा बंडल त्याच्या हातात ठेवला.

सुप्रिया सुळे म्हणतात, 'पुण्याचा महापौर आता राष्ट्रवादीचाच'

एरवीच्या परिस्थितीत संतुमामाला नानाने समोर उभेही केले नसते. त्याच्याशी प्रेमाने बोलण्याची गोष्ट तर लांब राहिली. थोडं चालल्यानंतर एकजण पाण्याच्या नळाशेजारी उभा होता. ‘नाना, दोन दिवस नळाला पाणी आलं नाही. आम्ही प्यायचं काय? अंघोळ तर लांब राहिली.’ तेवढ्यात नानाने एका कार्यकर्त्याला बोलावले व गाडीतून पन्नास लिटर बिसलरीचे पाणी द्यायला सांगितले. आता अंघोळ पण बिसलरीच्या पाण्यानेच कर. कमी पडलं तर अजून देतो,’ नानाने असं म्हटल्यावर तो माणूस खूष झाला. नाना तसेच पुढे चालू लागले. मतदारांसाठी सुरू असलेल्या जेवणावळीलाही त्यांनी भेट दिली. मटण बिर्याणीची चवही त्यांनी चाखली. त्यानंतर ते पुन्हा चालू लागले. वाटेत त्यांना ढाबा लागला. तिथे वीस-पंचवीस तरुण मुले डीजेच्या दणदणाटात दारू पिऊन नाचत होते. नानांना पाहिल्यानंतर सगळेजण त्यांच्याकडे धावले. ‘नाना, आपलं सीट लागतंय. आम्ही प्रचारच तसा रात्रंदिवस करतोय.’ त्यानंतर नानांनी ढाबा मालकाला पंचवीस हजार दिले. पोरांना काही कमी पडू देऊ नका, असा दमही दिला. नंतर नाना कार्यकत्यासोबत चालतच राहिले. वाटेत भेटणाऱ्यांच्या पाया पडू लागले. खिशात हात घालून पाचशेच्या दोन-तीन नोटा देऊ लागले. मद्यपींचे ‘इंग्रजीतील भाषण’ ऐकू लागले. त्याला एखादा खंबा देऊन त्याची बोळवण करू लागले. रात्री एकच्या सुमारास नाना घरी आले. दिवसभर चालून दमलेल्या नानांनी सोफ्यावर अंग टाकले. आज दीड लाख रुपये खर्च झाल्याचा हिशेब त्यांनी मनातल्या मनात केला. त्यानंतर लोकांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मतांचीही बेरीज ते करू लागले. तो आकडा साडे सहाशेच्या पुढे जात होता. मात्र, वॉर्डातील मतदारयादीत तर तीनशेच मतदार होते. हे कोडे काही त्यांना सुटेना. अजून तीन दिवस असाच खर्च करायचा आहे, मतांची रोज आकडेमोड करायची आहे, शिवाय लोकांशी गोड गोड बोलून, त्यांच्या पायाही पडायचे आहे, या विचारानेच नानांना घाम फुटला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image
go to top