बायकोला दागिन्यांची खात्री बजेटमुळे खिशाला कात्री

gold
gold

‘‘छे  छे.. या वर्षीच्या अर्थसंकल्पात काही अर्थ नाही. पुण्यातील मुळा- मुठा नदीत व्हेनिस शहराप्रमाणे वाहतूक सुरू करावी व त्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी करणारे पत्र मी वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिले होते. मात्र, पुणेकरांच्या मागणीला पाण्याऐवजी पानेच पुसायचे ठरवल्यावर आपण काय करणार? या बजेटने पूर्ण निराशा केली आहे.’’ महापालिकेतील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी आबा नरवणे पोटतिटकीने बोलत होते.

आज सकाळी आम्ही थोडी पोटपूजा करावी म्हणून वाडेश्‍वरमध्ये शिरलो होतो. आम्हाला पाहताच एखाद्या भक्ष्यावर वाघ जशी झडप घालतो, तशी झडप नरवणेने आमच्यावर घातली. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोघेजण होते. ‘‘अरे सकाळपासून मी या बजेटचा बारकाईने अभ्यास येथेच करतोय. तीन मसाला डोसा, दोन मिसळ मी एकट्याने संपवले. आमचे पोट भरले मात्र, या बजेटने सर्वसामान्य माणूस उपाशीच राहिला.’’ नरवणेने खंत व्यक्त केली. त्यावर त्यांच्यासोबत असणारे दोघे एकदम भडकले. ‘‘गेल्या शंभर वर्षात इतके उत्तम बजेट मी पाहिले नाही. सर्वसमावेशकता हा या बजेटचा आत्मा आहे आणि आत्मा नेहमी अमर असतो. त्यामुळे हे बजेटही अमर होईल.

या बजेटमुळे देशातील सगळे प्रश्‍न चुटकीसारखे सुटतील,’’ दिनू म्हात्रेने छातीवर हात ठेवत म्हटले. फक्त गोचिड निर्मूलनासाठी काही तरी करायला हवे होते. अन्यथा सरकारचा हा विभागच बंद पडून, आमचीच नोकरी जायची, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

‘‘खरं तर हे बजेट बहुआयामी आहे. तसेच सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून, त्याची बाह्यरचना केली आहे, अंतःमनाच्या निरपेक्ष सुखाची व्यामिशता बर्हिगोलाप्रमाणे प्रकट करणे हे या बजेटचे व्यवच्छेदक वैशिष्ट्ये आहे.’’ एका प्रकाशन संस्थेतून मजकूर आॅपरेट करणारा जगू कोंडेकर बोलत होता. मात्र, त्याला मध्येच थांबवत आबा नरवणेने आपली गाडी पुढे रेटली. थोड्याच वेळात त्या तिघांत चांगली जुंपली. अगदी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याइतपत परिस्थिती ओढवली. ‘‘माझंच बरोबर आहे. गेली तीस वर्षे मी बजेटचा अभ्यास करतोय,’’ असे प्रत्येकजण एकमेकांना शिरा ताणून सांगत होता. भांडणे विकोपाला गेल्याचे पाहून वेटरने बिल आणले. बिल पाहताच त्या तिघांनीही काढता पाय घेतला आणि आम्ही वेटरच्या तावडीत आयतेच सापडलो. चहाचा घोटही न पिता बाराशे रुपयांचे बिल आम्ही मुकाट्याने भरले. या अर्थसंकल्पाचा आम्हाला असाही फटका बसेल, अशी आम्ही कधी अपेक्षा केली नव्हती. त्यानंतर तडक आम्ही घरी आलो. तर बायको कागद घेऊन, त्यावर काही तरी बेरीज- वजाबाकी करत होती. ‘‘अगं मला खूप भूक लागली आहे. पटकन वाढ काहीतरी.’’ असे आम्ही म्हटले. 

त्यावर बायको आमच्यावरच रागावली. ‘‘अहो, आज बजेट होते. सकाळी अकरापासून ते दोनपर्यंत मी टीव्हीपासून अजिबात हलले नाही. त्यामुळे मला स्वयंपाक करता आला नाही.’’

‘‘क्काय ! तू बजेट बघत होतीस,’’ आम्ही मोठ्याने किंचाळलो. सबसिडी आणि सापशिडी याच्यातील फरक तुला कळत नाही आणि घरातील कामं सोडून तू बजेट बघत होतीस?’’

आम्ही अविश्‍वासाने म्हटले.

‘‘हो ! आणि या बजेटमधून सोनं स्वस्त होणार, हे मला कळलंय. त्यामुळं आपण लगेचच दागिने खरेदीला निघायचं. तिकडून आल्यानंतरच मी स्वयंपाकाला हात लावेन. नाहीतर राहा उपाशी.’’ बायकोने निर्वाणीचा इशारा दिला. हे बजेट आमच्या खिशाला आणखी किती कात्री लावणार आहे, या विचारात सध्या आम्ही पडलोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com