भले भांडा, भले तंडा;मास्क असू द्या तोंडा!

mask
mask

कोरोनामुळे हल्ली भांडणाचा पॅटर्नच बदलला आहे. पूर्वी ‘तोंड सांभाळून बोल’ हे वाक्य भांडण समेवर असताना असायचं. मात्र, आता ‘मास्क घालून बोल’ हे वाक्य पेटंट ठरत आहे. मास्क घालून भांडायला जोर येत नाही. त्यामुळं भांडण लवकर संपुष्टात येतं. मात्र, ‘‘जा. जा.. मास्क नाय घालणार. ’’ असे एखाद्याने म्हटले तर प्रतिस्पर्ध्याबरोबरच बघ्यांकडूनही फटके पडण्याची शक्यता अधिक असते आणि लगेचच पोलिसांना फोन करून बोलावले जाते आणि पोलिसही चूक कोणाची हे न बघता थेट पाचशे-हजारांची पावती फाडतात. त्यामुळे भांडणे कमी करायची असतील तर मास्क अनिवार्य आहे, असे आमचे स्वतःचे मत आहे.

आता कालचीच गोष्ट. दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्याने एक जण हमरी-तुमरीवर आला. आम्हीही काही कमी नव्हतो. ‘जशास तसे’ उत्तर दिले. मात्र, ‘मास्क घालून आमच्याशी भांडा’, अशी विचित्र मागणी प्रतिस्पर्धी व्यक्तीने केली. 

‘तू कोण सांगणार मास्क घालायला? जा. नाही घालणार. काय करायचे ते कर,’ असे बाणेदार उत्तर आमच्या मुखातून गेले. त्यामुळे त्याने पोलिसाला बोलावले. थोड्याच वेळात दोन पोलिसही आले. त्यांनी आधी गर्दी पांगवली. ‘भांडणात आमची काय चूक नाही’ हे आम्ही पोलिसांना पटवून द्यायचा प्रयत्न करू लागलो; पण पोलिसांनी आम्हाला थांबवले व ‘आधी सहाशे रुपये दंड भरा’ अशी मागणी केली. मास्क न घालता पहिल्यांदा आढळल्यावर पाचशे रुपये व दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर आम्ही एकदम नमते घेतले. ‘साहेब, पन्नास रुपयांवर मिटवा.’ असा प्रस्ताव आम्ही ठेवला. त्यानंतर हा आकडा वाढवून शंभर, दीडशे व दोनशेपर्यंत नेला. मात्र, लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल, असे त्यांनी सांगितल्यावर आम्ही माघार घेतली.

‘‘दंड पाचशे रुपये असताना तुम्ही सहाशे रुपयांची मागणी कशी करता? हे तुमच्या नीतीमत्तेत बसते का. या संदर्भात आम्ही गृहमंत्र्यांकडे तक्रार करू. हे काय चालले आहे पुण्यात?’’ असा वेगळा पवित्रा आम्ही घेतला. विषयाला कलाटणी देऊन, तो दुसऱ्यावर उलटविण्यात आमचा हातखंडा आहे. ‘‘हे बघा. आधी सहाशे रुपये द्या. नंतर पुढचं बोला.’’ पोलिसाने असं म्हटल्यावर आम्ही निमूटपणे सहाशे रुपये त्यांच्या हातावर टेकवले. लगेचच त्यांनी पाचशे रुपये दंडाची पावती आमच्या हातावर ठेवली. पावती बघून आमचा राग अनावर झाला. 

‘‘आमच्या कष्टाचे शंभर रुपये खाणं, हे तुम्हाला शोभतं का? तुम्हाला जसं कुटुंब आहे, तसं आम्हालाही आहे, याचा विचार करा.’’ आम्ही रागात म्हटले. त्यावेळी शांतपणे त्यांनी शेजारच्या पिशवीतील चार मास्क काढून आमच्या हातावर ठेवले. ‘‘कोरोना वाढतोय. त्यामुळे मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. पुढच्या वेळी विनामास्क सापडलात, तर हजार रुपये दंड पडेल आणि कोरोना झाला तर हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च होऊन, जीवावरही बेतेल. त्यामुळे तुम्हाला जसं कुटुंब आहे, तसं आम्हालाही आहे. या गोष्टींचा विचार करा आणि मास्क वापरा.’’ पोलिसांचे हे बोलणे ऐकून आम्ही त्यांना रस्त्यावरच सॅल्युट ठोकला. सध्या आम्ही मास्कशिवाय घराबाहेर पडत नाही. त्यामुळे भांडणे तर होत नाहीच. शिवाय दंडही भरावा लागत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनालाही आम्ही दूर ठेवलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com