सोसायटीतील अलबत्ते-खलबत्ते! 

panchnama
panchnama

‘‘हा काय प्रकार आहे? सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायझर, टेंपरेचर गन आणि ऑक्‍सोमीटर का नाही? सर्व सभासदांना कोरोना व्हावा, अशी चेअरमनची इच्छा आहे का? मी आजच आरोग्यमंत्री व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, याबाबतची माहिती देतो. तरीही  चेअरमनने या वस्तूंची खरेदी केली नाही तर मी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याशेजारी दोन तास आमरण उपोषण करील.’’ आज सकाळीच सोसायटीच्या गेटजवळ दिनूभाऊ किरकिरे यांनी तणतण करायला सुरवात केली. त्यातच सुरक्षारक्षक शेजारील सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसोबत गप्पा मारत असल्याचे पाहून, त्यांचे डोके आणखी सटकले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘सॅनिटायझर आणि इतर वस्तूंसाठी आर्थिक तरतूद केली असतानाही खरेदी होत नाही तर हा पैसा जातो कोठे? आमच्या आरोग्याशी खेळायला चेअरमनला कोणी अधिकार दिला.’’ दिनूभाऊ मुद्दाम आवाज चढवून बोलू लागले. अनेकांनी फ्लॅटचे दार किलकिले करून, त्यांचे बोलणे ऐकू लागले. त्यामुळे त्यांना आणखी जोर चढला. खरं तर दिनुभाऊंना सोसायटीचे चेअरमन व्हायचे होते पण दोन्ही निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याने ते चेअरमन काथवटे यांना पाण्यात पहात होते. मग दिनुभाऊंनी आपला मोर्चा काथवटे यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घराची तीन- चार वेळा बेल करकचून दाबली. दार उघडेपर्यंत त्यांना दम धरवत नव्हता. रात्रपाळी करून आलेले काथवटे यांनी जांभया देतच दार उघडले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘काथवटे, हा काय प्रकार आहे’’?

‘‘सॉरी, रात्रपाळी करून आल्याने जांभई आली.’’ पुन्हा जांभई देत काथवटे म्हणाले.   

‘‘ते नाही म्हणत मी. सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायझर, टेंपरेचर गन आणि ऑक्‍सोमीटर का नाही. लोकांना कोरोना व्हावा, अशी तुमची इच्छा आहे का’’? 

‘‘अहो, आतापर्यंत पाच- सहा वेळा या गोष्टी चोरीला गेल्यात.’’ जांभई लपवत काथवटे म्हणाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘मग पोलिसांमध्ये तक्रार केली का? पोलिस आयुक्तांना पत्र पाठवलं का? हा सगळा तुमचा बेजबाबदारपणा आहे. त्याची फळे आम्ही का भोगायची? 

सोसायटीच्या मिटींगमध्ये मी तुमचा निषेध नोंदवणार आहे.’’

‘‘ठीक आहे. नोंदवा. बरं मी आता झोपू का?’’ काकुळतीला येत काथवटे यांनी दार लावून घेतले.

‘‘झोपा. झोपा. आम्ही तेवढ्यासाठीच तुम्हाला चेअरमन केलंय. कामं नकोत करायला. फक्त पदं भोगायला पाहिजेत. अशानं देशाचं कसं व्हायचं?’’ सगळी सोसायटी ऐकेल, अशा आवाजात दिनुभाऊ बोलले. 

काही दिवसांनी गणूभाऊंच्या मिसेसचा सुमतीताईंचा काथवटे यांना फोन आला.‘‘आमच्या बाथरूमच्या नळाचा व्हॉल्व तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. आमचे ‘हे’ घरी नाहीत. त्यामुळे प्लीज मदत करा.’’ त्यामुळे काथवटे यांनी सेक्रेटरी कोरेकर व प्लंबरला सोबत घेऊन, गणूभाऊंचं घर गाठलं. प्लंबरने दहा मिनिटांतच नळ दुरुस्त केला. काम चेक करावे, यासाठी काथवटे बाथरूममध्ये गेले. समोरचे दृश्‍य पाहून, ते चांगलेच हबकले.

सॅनिटायझरने अर्धवट भरलेल्या दहा- बारा बाटल्या, सात- आठ टेंपरेचर गन आणि तितकेच ऑक्‍सोमीटर त्यांना बाथरूमच्या फडताळावर दिसले. त्यांनी कोरेकरांनाही हा प्रकार दाखवला. तेवढ्यात गणूभाऊच घरी आले.

‘‘आज काय कोठे चहा मिळाला नाही वाटतं? म्हणून आमच्या घरी येणं केलंत.’’? कुजकटपणे गणूभाऊ बोलले.

‘‘तुम्ही जुने सॅनिटायझर, टेंपरेचर गन आणि ऑक्‍सोमीटर विक्रीचे दुकान काढल्याने, तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात म्हणून आलोय.’’ असे म्हणत बाथरूममधील त्या वस्तूंकडे बोट दाखवले. ‘‘अहो..ते...ते..असं...तसं....नाही...’’ आवंढा गिळत ततपप करीत गणूभाऊ एवढेच म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com