भुयारी मार्ग बनला कचराकुंडी ! (व्हिडिओ)

नीलम कराळे
बुधवार, 27 जून 2018

पुणे - केशवराव जेधे उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तसेच जुगारी, तळीराम आणि नशेखोरांच्या टोळक्‍यांच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे भुयारी मार्ग जणू कचराकुंडीच बनला आहे. 

स्वारगेट चौक ते सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने जेधे उड्डाण पुलाची उभारणी केली. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गदेखील उभारला. परंतु महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा भुयारी मार्ग असुरक्षित बनला आहे. त्यामुळे याचा वापर न करता नागरिक जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडतात. बीआरटीचे सुरू असलेले काम, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे या समस्येत आणखी भर पडत आहे. 

या भुयारी मार्गात राजरोसपणे जुगाऱ्यांचे डाव चालतात. तसेच कचरा टाकण्यासाठी आणि लघुशंकेसाठीदेखील या मार्गाचा वापर होत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. भुयारी मार्गात महापालिकेने दुकाने उभारली आहेत. मात्र दुरवस्थेमुळे येथील दुकाने बंद आहेत. 

भुयारी मार्ग असुरक्षित आणि अस्वच्छ असल्याने त्याचा वापर करणे टाळते. माझ्या दोन मुलांना शाळेच्या बसमध्ये सोडण्यासाठी नाइलाजाने रस्ता ओलांडावा लागतो. 
- संपदा भोसले, स्थानिक रहिवासी 

वाहतुकीतून मार्ग काढण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करावा तर तो सुरक्षित नाही तसेच हे ठिकाण गुन्हेगार, जुगारी लोकांचा अड्डा बनला आहे. 
- महादेव कापडे, ज्येष्ठ नागरिक 

Web Title: subway of Keshavrao Jedhe flyover Cleanliness