दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर दृष्टिहीनांचे स्पर्धा परीक्षेत यश 

pune.jpg
pune.jpg

पुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले. डोळसांनाही प्रचंड कष्ट करायला लावतात, अशा स्पर्धा परीक्षेत त्यांनी यशस्वी मजल मारली. हे स्वप्नं सत्यात उतरवून दाखविले ते साताऱ्यातील सुजित शिंदे आणि मनोज माने यांनी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या "राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) मुख्य परीक्षेचा राज्य करनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत दृष्टिहीनांसाठी दोन जागा होत्या. या पदापर्यंत पोचण्यात साताऱ्यातील शिंदे आणि माने यांना यश आले. शिंदे हे 100 टक्के दृष्टिहीन आहेत. 

शिंदे यांनी 2009 मध्ये रेल्वे भरतीतील तृतीय श्रेणीतील परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाले. सातारा रेल्वे स्थानकावर ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले; परंतु त्या वेळी उद्‌घोषणा देण्याचे आणि चौकशी कार्यालयातील कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. रेल्वेमध्ये 2018 पर्यंत सेवा केल्यानंतर त्यांनी बॅंकिंगच्या परीक्षा देण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांची साताऱ्यातील आंध्र बॅंकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते याच बॅंकेत काम करत आहेत. काम करताना शिंदे हे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत होते. 

शिंदे यांचे वडील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात; तर त्यांच्या मातु:श्री त्यांना लहानपणापासून अभ्यासविषयक ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) करून ऐकवत असे. त्या ध्वनिमुद्रणाच्या साहाय्याने शिंदे यांनी अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी देखील पुस्तकाचे, महत्त्वाच्या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण करून अभ्यास केल्याचे शिंदे यांनी सांगितले. अभ्यासासाठी पत्नी अश्‍विनी आणि मित्रपरिवार यांनी मदत केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

दृष्टी नसली म्हणून काय झाले, आम्ही कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकतो. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून आम्हीदेखील एखादे चांगले पद मिळवून शकतो. म्हणूनच चांगल्या पगाराची नोकरी असतानाही वेगवेगळ्या क्षेत्रांत दृष्टिहीन मोठे यश मिळवू शकतात, हे जगाला दाखवून द्यायचे आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न साकारत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com