उलगडले मानवी "जिनोम'चे गूढ; पुण्यातील संशोधकांचे यश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील, तसेच विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अन्य संशोधन संस्थांमधील संशोधकांनी केले आहे.

पुणे-  एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील, तसेच विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अन्य संशोधन संस्थांमधील संशोधकांनी केले आहे. ते आंतरराष्ट्रीय विज्ञान संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. 

मानवी जनुकीय आराखड्याच्या (जिनोम) त्रिमितीय रचनेत कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या "स्कॅफोल्ड्‌ मॅट्रिक्‍स अटॅचमेंट रिजन्स'चा (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात या संशोधकांनी यश मिळवले आहे. तसेच एड्‌स, कर्करोग यांसारख्या गंभीर व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या "रेट्रोव्हायरस' कुळातील विषाणूच्या संसर्गाचा मानवी "जिनोम'शी असलेला संबंध शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. 

पुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र विभागातील डॉ. अभिजित कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. स्मृती मित्तल, पुण्यातील राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) आणि कोलकता येथील भारतीय रासायनिक जीवविज्ञान संस्थेचे (आयआयसीबी) डॉ. समित चट्टोपाध्याय यांच्यासह विद्यार्थी संशोधक नितीन नरवडे, सोनल पटेल व आफताब आलम यांच्या गटाने हे संशोधन केले आहे. ते "ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'च्या "न्यूक्‍लिक ऍसिड्‌स रीसर्च जर्नल'मध्ये जूनच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. ते विज्ञान संशोधनासाठीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे जर्नल मानले जाते. 

काय आहे संशोधन? 
गेल्या चार वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. संशोधकांनी "बायोलॉजिकल डेटा मायनिंग' म्हणजेच उपलब्ध नोंदीचा उपयोग करून, संपूर्ण मानवी "जिनोम'मधील महत्त्वाचा घटक असलेल्या "स्मार'चा आराखडा तयार केला. नंतरच्या टप्प्यात एचआयव्ही (एड्‌ससाठी कारणीभूत ठरणारा) आणि एचटीएलव्ही (कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा) यासारख्या विषाणूंची लागण असणाऱ्या 12 लाख नमुन्यांचा अभ्यास केला. तसेच, हा विषाणू आणि मानवी "डीएनए'च्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा संबंध बारकाईने अभ्यासला. त्याद्वारे हे घातक विषाणू मानवी "स्मार' आणि त्यांच्या त्रिमितीय संरचनेत कसे आणि कुठे प्रवेश करतात, याचा उलगडा केला. त्यामुळे या विषाणूंच्या माणसाच्या "डीएनए'मधील शिरकावाबद्दल महत्त्वाची माहिती जगापुढे आल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. 

संशोधनाचा उपयोग 
एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील तसेच, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल. मानवी जिनोमची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 
- डॉ. अभिजित कुलकर्णी, संशोधक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The success of researchers in Pune