#mynewspapervendor वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गगन भरारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

विक्रेत्यासोबत सेल्फी 
वर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत घ्या एक सेल्फी आणि सलाम करा थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना. हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 99224 19150 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल. 
 

पुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्‍टोबर हा या वर्षीपासून वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "सकाळ माध्यम समूहाने' हा दिन साजरा करण्यात पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या काही यशोगाथा. 

रोलबॉलचा पुणेकर जनक 
"रोलबॉल' या खेळाची पुण्याच्या मातीत निर्मिती करून त्याला जागतिक पातळीवर पोचवणारे राजू दाभाडे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते रोलबॉलचे जनक, हा प्रवास थक्क करणारा आहे. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंबाला हातभार मिळावा, यासाठी दाभाडे यांनी वृत्तपत्र विक्री सुरू केली. पहाटे तीन वाजता उठून एजंटकडून ते अंक घ्यायचे, त्यानंतर ग्राहकांपर्यंत ते वेळेत पोचवून मग शाळेत जाणे, असा त्यांचा दिनक्रम होता. वृत्तपत्र विक्री करत त्यांनी स्वतःची "श्रीराज एजन्सी' सुरू करून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील बालशिक्षण मंदिरामध्ये ते क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले. 

तरी काही वेगळं करायचा, असा ध्यास घेऊन त्यांनी संशोधन करण्यास सुरवात केली. बास्केटबॉल, फुटबॉल या खेळांचा अभ्यास करून आपणही काहीतरी नवीन करू शकतो, हे ओळखून त्यांनी स्केटिंग व बॉल एकत्रित खेळण्याचा प्रयत्न केला. खरंतर स्केटिंग व बॉल एकत्र खेळणं अवघड आहे. तरी सराव केला, तर जे जमू शकेल, असा विश्वास मनात बाळगून त्यांनी हा खेळ खेळण्यास सुरवात केली. आता पूर्णतः "मेक इन इंडिया' असलेला रोलबॉल हा खेळ जगातील पन्नासहून अधिक देशांमध्ये लोकप्रिय झाला आहे. 

दाभाडे यांच्यासह त्यांची कन्या डॉ. देवयानी दाभाडे हीसुद्धा रोलबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा मुलगा रोहन हा सध्या एमबीएचे शिक्षण पूर्ण करत असून तोही रोलबॉलमधील जागतिक पातळीवरील खेळाडू आहे. तोही वृत्तपत्र विक्री व्यवसाय सांभाळतो. दाभाडे यांनी त्यांच्या एजन्सीत काम करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षणासाठी मदत करून नामांकित महाविद्यालयांमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

Web Title: Success stories of newspaper vendors