तोट्यातील संस्था आणली नफ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

स्पर्धेबरोबर आव्हाने वाढली. यशाला ग्रहण लागले आणि तोट्याचा डोंगर वाढला. त्यावर मात करण्यासाठी ‘कात्रज’च्या व्यवस्थापनाने कंबर कसली. तंत्रज्ञानाचा अवलंब करत उपपदार्थांच्या निर्मितीवर भर देत पुन्हा पूर्ववैभव मिळवले.

श्रीखंड, बर्फी, आइस्क्रीम, पनीर, तूप अशी विविध ३२ प्रकारची ९१ उत्पादने, त्यांच्या विक्रीसाठी उघडलेली दुकाने, वर्षागणिक वाढणारा नफा आणि त्यात शेतकऱ्यांना वाटा देण्याची भूमिका, यामुळे पुणे जिल्हा सहकारी दूध संघ (कात्रज डेअरी) खासगी व्यावसायिकांच्या स्पर्धेतही पुन्हा दमदार वाटचाल करत आहे. संस्थेची स्थापना १९६० मध्ये झाली. सहकार चळवळीच्या माध्यमातून तो वेगाने विस्तारला. रोज दीड लाख लिटर दुधाची विक्री करत १९८८ मध्ये कात्रज डेअरी देशातील जिल्हा संघांत प्रथम क्रमांकावर पोचली. रोज पाच लाख लिटर दूध संकलन करत अमूल, मेहसाना संघानंतर संस्था देशात तिसऱ्या क्रमांकावर पोचली. त्या वेळी स्पर्धा नव्हती. सरकार, कात्रज आणि एका संस्थेचे दूध पुण्याच्या बाजारात होते. १९९२ मध्ये आर्थिक उदारीकरण आले. खासगी प्रकल्प उभे राहू लागले. देशात सर्वाधिक ६५ खासगी प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहेत, तर लहान-मोठ्या शंभर ब्रॅंडचे दूध पुण्यात विक्रीसाठी आहे.

वाढत्या स्पर्धेचा ‘कात्रज’च्या दूध संकलनावर परिणाम झाला. संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली. १९९८ मध्ये सर्वाधिक तोटा झाला. २००४ मध्ये दूध विक्री प्रतिदिन पन्नास हजार लिटरच्या आत पोचली. याच काळात कात्रज डेअरीने बदल घडविण्याचे ठरविले. गुणवत्तावाढीला प्राधान्य दिले. आयएसओ प्रमाणपत्र मिळविले. दुधाची प्रत सुधारली. १९८५ च्या सुमाराला कॅडबरी डेअरीसाठी लो फॅटचे दूध लागायचे. ते पुरविताना क्रीम काढावी लागे. संस्थेने ती क्रीम आणि तूप विक्रीला काढले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेने उपपदार्थ बनविणे सुरू केले. चांगल्या प्रतिच्या दुधामुळे उपपदार्थ दर्जेदार होत. त्याच्या विक्रीसाठी पार्लर सुरू केले. जिल्ह्यात आज दोनशे पार्लरमधून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. लवकरच बासुंदीचे उत्पादन सुरू होणार आहे.

होमोजिलायझर, मिल्क क्‍लॅरिफायर बसवून डेअरीच्या यंत्रणेत आधुनिकता आणली. कंडेन्स मिल्क प्लॅंट बसविला. १५ एकर जमीन संस्थेच्या नावावर केली. २००१ मध्ये संस्थेची मालमत्ता आठ कोटी ९६ लाख रुपयांची होती, ती आता १२५ कोटींवर गेली आहे. दूध संकलन वाढविण्यासाठी नॅशनल डेअरी प्लॅनअंतर्गत नऊ कोटी रुपयांची योजना आखून त्याची अंमलबजावणी सुरू केली. कृत्रिम रेतन सेवा, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशिन, बी-बियाणे, खनिज मिश्रण शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाते. उत्पादकांसाठी मेळावे होतात. आठ चिलिंग सेंटर सुरू केली. दुधाची प्रत टिकवण्यासाठी पाचशे ते पाच हजार लिटर क्षमतेची बल्क कूलर सेंटर ठिकठिकाणी बसविली. टॅंकर स्वच्छतेसाठी खास तंत्राचा अवलंब केला. अपारंपरिक ऊर्जेसाठी संस्थेने सलग पाच वर्षे पुरस्कार मिळविला. दहा वर्षे लेखापरीक्षणाचा दर्जा ‘अ’ मिळाला. कात्रज डेअरी एक्‍स्पो प्रदर्शन भरविण्यात आले. संस्थेला आयएसओ २२००० ः २००५ मानांकन मिळाले. उत्पादकांना एकच भाव मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. जिल्ह्यात १४ ते १५ लाख लिटर दूध रोज उपलब्ध होते. त्यापैकी दहा लाख लिटर विक्रीसाठी मिळते. त्यापैकी सव्वादोन लाख लिटर दुधाचे संकलन कात्रज डेअरीमार्फत होते. त्यापैकी दीड लाख लिटर दुधाची थेट विक्री होते. राहिलेले ५० हजार लिटर अन्य डेअरींना विकले जाते, तर २५ हजार लिटर दूध उपपदार्थांसाठी वापरले जाते. 

कात्रज डेअरीने वरंवड येथे दिलेल्या जमिनीवर ‘महानंदा’सोबत (राज्य दूध संघ) दूध पावडर प्रकल्प उभारला. संस्थेचा तोटा हळूहळू कमी होत गेला. २००९ मध्ये सर्व संचित तोटा भरून निघाला. संस्थेची २०१५-१६ मधील वार्षिक उलाढाल २५० कोटी रुपये असून, व्यापारी नफा तीस कोटी रुपये झाला. निव्वळ नफा २.६९ कोटी रुपये झाला. दूध उत्पादकांना प्रतिलिटरमागे एक रुपया जादा दिला. त्यांना सुमारे सात कोटी रुपये वाटण्यात आले. राष्ट्रीय दुग्धविकास योजनेंतर्गत डेअरी विस्तारीकरण आणि दूध संकलन व्यवस्था बळकटीकरण (कोल्ड चेन) यांसाठी ३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे आणि कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

Web Title: success story