esakal | बारामतीत ड्रोनद्वारे शिवारात औषध फवारणी प्रात्यक्षिक यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत ड्रोनद्वारे शिवारात औषध फवारणी प्रात्यक्षिक यशस्वी

बारामतीत ड्रोनद्वारे शिवारात औषध फवारणी प्रात्यक्षिक यशस्वी

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव : अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट - बारामती संचलित कृषि विज्ञान केंद्रच्या (केव्हीके) वतीने शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर नेदरलँड व इस्राईलच्या धर्तीवर विविध तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. त्यामध्ये ठिबक सिंचन, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, भाजीपाला कलमी रोपे, भाजीपाला निर्यात व माती विना शेती तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

त्यातच आता केव्हीकेच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राने आणि गरुडा एरोस्पेस प्रा. लि. कंपनी (चेन्नई) यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे पिकावर औषध फवारणीचे तंत्रज्ञान शिवारात आणले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवार (ता.९) रोजी ड्रोनद्वारे केव्हीकेच्या कार्यस्थळावरील शिवारातील विविध पिकांवर औषधे फवारणी प्रात्यक्षिक यशस्वी करण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना केव्हीकेचे प्रमुख डॉ. आर. एस. जाधव, उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ वाय.एल.जगदाळे यांनी मार्गदर्शन कले. यावेळी श्री. जगदाळे म्हणाले,`` ड्रोनद्वारे पिकावर औषधे फवारणीच्या प्रात्यक्षिकामुळे पिक फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ कमी होत आहे. एकरी पाण्याचे प्रमाण व औषध हि कमी लागत आहे. ड्रोनची उपयुक्तता शिवारात खूप महत्वाची ठरत आहे.``

हेही वाचा: न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

यावेळी ड्रोनची कार्यक्षमता, शेतीमधील अर्थशास्त्र आदी विषयावर केव्हीचे प्रमुख डॉ. जाधव यांनी उपस्थितांना माहिती दिली. `` सध्या शेती व्यवसायात मंदी बरोबर स्पर्धाही खूप वाढली आहे. त्यामुळे कमी खर्चाच अधिक उत्पन्न घेण्यासाठी आपल्या शिवारात नेदरलँड व इस्राईलच्या धर्तीवर विविध तंत्रज्ञान उपलब्ध होणे आता क्रमप्राप्त ठरत आहे. त्याच हेतूने बारामती केव्हीकेने ड्रोनद्वारे शिवारात औषध फवारणी तंत्रज्ञान आणले आहे. त्याचे प्रात्यक्षिक पाहिल्याने यापुढील काळात हे तंत्रज्ञान आमच्या भागात राबविण्याचा मानस आहे,`` असे मत शेतकरी विलास पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, संस्थेचे सीईओ निलेश नलवडे यांनी बारामतीसह अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना नव नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्यास व हाताळयास मिळत असल्याने समाधान वक्त केले.

loading image
go to top