साखरेच्या उचलीवर 85 रुपये घट

संतोष शेंडकर
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सोमेश्‍वरनगर - साखरेच्या भावात घसरण झाल्याने राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या पोत्यावर (प्रतिक्विंटल) दिल्या जाणाऱ्या उचलीत प्रतिटन ८५ रुपयांची घट केली आहे. त्यातून उसाच्या बिलासाठी १६३० रुपयांऐवजी १५४५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे रक्कम कारखान्यांना मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे हंगाम अजून सुरू आहेत किंवा उसाची शेवटची बिले राहिली आहेत, अशा कारखान्यांना बिलांच्या पूर्ततेसाठी एक हजार रुपये प्रतिटन रक्कम जुळवायची कशी? असा प्रश्‍न पडला आहे.

सोमेश्‍वरनगर - साखरेच्या भावात घसरण झाल्याने राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या पोत्यावर (प्रतिक्विंटल) दिल्या जाणाऱ्या उचलीत प्रतिटन ८५ रुपयांची घट केली आहे. त्यातून उसाच्या बिलासाठी १६३० रुपयांऐवजी १५४५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे रक्कम कारखान्यांना मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे हंगाम अजून सुरू आहेत किंवा उसाची शेवटची बिले राहिली आहेत, अशा कारखान्यांना बिलांच्या पूर्ततेसाठी एक हजार रुपये प्रतिटन रक्कम जुळवायची कशी? असा प्रश्‍न पडला आहे.

राज्य सहकारी बॅंकेने साखरेचे मूल्यांकन हंगामाच्या सुरवातीला ३५०० रुपये होता. हंगाम सुरू होताच नोव्हेंबरअखेर साखर मूल्यांकन ३२७५ रुपये करण्यात आले. यानंतरही चार टप्प्यांत मूल्यांकन ५७५ रुपयांनी घटविले. मंगळवारी राज्य सहकारी बॅंकेने साखरेचे मूल्यांकन २७०० रुपये गृहीत धरले. त्या रकमेच्या ८५ टक्के २२९५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कारखान्यांना उचल दिली जाणार आहे. यामध्ये उसाच्या बिलासाठी १५४५ रुपये दिले जाणार आहेत. अन्य ७५० रुपयांपैकी ३०० रुपये विविध कर्जांच्या व्याजापोटी, २५० रुपये प्रक्रिया खर्चासाठी, एक्‍साइज करासाठी १०० रुपये आणि अन्य खर्चांसाठी १०० रुपये दिले जाणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच बॅंकेने उसाच्या बिलासाठी १६३० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी १७७५ रुपये दिले जात होते. 

आता बॅंकेकडून ऊस बिलासाठी १५४५ मिळणार आहेत; परंतु एफआरपी (रास्त व उचित दर) प्रतिटन २४०० ते २७०० रुपये प्रतिटनापर्यंत आहे. त्यामुळे वरचे एक हजार रुपये प्रतिटन इतकी रक्कम उभारायची कोठून, असा प्रश्‍न कारखान्यांपुढे संकट बनून उभा आहे. 

शेतकऱ्यांना बिले देण्यात अडचणी
ज्या कारखान्यांचा हंगाम संपला आहे, त्यांना या दराची उचल मिळणार नाही; परंतु पुणे, सातारा, नगर जिल्ह्यांत अद्यापही सुरू असलेल्या कारखान्यांना ही उचल स्वीकारावी लागणार आहे. याआधीच अनेक कारखान्यांची फेब्रुवारीपासूनची ऊसबिले रखडली आहेत. वाहतूकदार व व्यापाऱ्यांची देणी तर बहुतेक कारखान्यांनी मागे ठेवली आहेत. घोडगंगा, सोमेश्‍वर अशा मातब्बर कारखान्यांनाही शेवटची बिले देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील एका कारखान्याने तर फेब्रुवारीनंतर एक रुपया शेतकऱ्यांना दिला नाही. 

कारखाने याच हंगामात तोट्यात जाणार आहेत. आगामी हंगामात तर कुणीही सुटणार नाही.
 - बाळासाहेब कदम, वित्त व्यवस्थापक, सोमेश्‍वर साखर कारखाना

पुढील हंगाम कोलमडणार - अशोक पवार
याबाबत घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले, ‘‘साखर उत्पादनात उत्तर प्रदेश व महाराष्ट्र प्रत्येकी १०० लाख टनांपुढे गेले आहेत. हंगाम सुरू होण्याआधी पाऊस चांगला होऊन उत्पादन वाढणार, हे अंदाज होते. तरीही सरकारने साखर आयात केली. हंगाम सुरू झाल्यावर तातडीने आंतरराष्ट्रीय दर चांगले असताना साखर निर्यात करणे गरजेचे होते. आता प्रचंड दर घसरून बॅंकेने ऊसबिलासाठी १५४५ रुपये दिले आहेत.

कारखान्यांनी बिले द्यायची कशी? शेतकऱ्यांचे प्रत्येक टिपरे तर गाळलेच पाहिजे. या सरकारच्या धोरणामुळे पुढील हंगाम कोलमडणार आहे.’’ 

Web Title: sugar rate