शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग; नागापुर येथील घटना

नवनाथ भेके
Friday, 20 November 2020

 नागापुर (ता. आंबेगाव) येथील तीन एकर ऊसाला शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

निरगुडसर : नागापुर (ता. आंबेगाव) येथील तीन एकर ऊसाला शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विदयमान संचालक देवदत्त निकम यांचा हा ऊस होता. 

पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी आग लागल्यानंतर नागरीकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू, आगीचा भडका मोठा असल्याने ड्रीपसह ऊस जळून नुकसान झाले. शुक्रवारी भीमाशंकर कारखान्याने तातडीने ऊस तोडला आहे.

नागापुर गावाजवळ निकम यांची ऊसशेती आहे. येथील तीन एकर ऊसाला ड्रीपव्दारे पाणी दिले जाते. या ऊसातून लोंबकळलेल्या तारांसह, डीपी पण शेताच्या बांधावर आहे. तारांच्या घर्षणामुळे शार्टसर्किट होऊन तीन एकरातील तोडणीला आलेला ऊसाला गुरुवारी सांयकाळी आग लागली. ऊसाला आग लागल्याचे कळताच स्थानिक शेतकरी, नागरीकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे स्वरुप मोठे असल्याने अपयश आले.  या घटनेत सर्व ऊस जळाला, तसेच ड्रिप यंञणाही जळून खाक झाली. यामुळे ड्रीपचे व उस जळल्याने वजनात झालेली घट यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची माहीती कळताच भीमाशंकर कारखान्याचे शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने ऊस तोडण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी तातडीने ऊस तोडणी करण्यात आली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane fire at Nagapur due to short circuit