ऊसगाळप ऑक्टोबरपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे - राज्यात या वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन होणार आहे, त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम महिनाभर अगोदरच म्हणजे एक ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. साखर संकुलात बुधवारी साखर कारखान्यांची बैठक झाली.  

पुणे - राज्यात या वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन होणार आहे, त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम महिनाभर अगोदरच म्हणजे एक ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. साखर संकुलात बुधवारी साखर कारखान्यांची बैठक झाली.  

देशमुख म्हणाले, ‘‘राज्यात गतवर्षी सुमारे नऊ लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उत्पादन झाले. तर, यंदा ११.६२ लाख हेक्‍टर क्षेत्रावर उस उत्पादन घेण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र २.६६ लाख हेक्‍टरने जास्त आहे. या हंगामात १९५ साखर कारखाने सुरू होणे अपेक्षित असून, ९४१ लाख टन उसाचे गाळप होईल. गतवर्षी जादा उत्पादकतेमुळे १०७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. मात्र, या वर्षी खोडव्याचे प्रमाण अधिक असल्याने साधारण गतवर्षीएवढेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. आजारी साखर कारखानेही सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. गरज पडल्यास सरकार यशवंत कारखाना सुरू करण्याबाबत विचार करेल. गतवर्षीप्रमाणे यंदाही गाळप परवाने ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतील. वजन काट्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली जाईल.’’  

या वेळी खासदार धनंजय महाडिक, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते.

५६ कारखान्यांकडे ५९३ कोटी एफआरपी थकीत
राज्यातील ५६ साखर कारखान्यांकडे एफआरपीपोटी ५९३ कोटींची रक्‍कम थकीत आहे. गेल्या दोन महिन्यांत १५ कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे थकीत एफआरपीची रक्‍कम निम्म्यावर आणण्यात यश आले आहे. स्वतःच्या लोकमंगल साखर कारखान्याकडे १६ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. साखरेचे भाव कमी झाल्यामुळे एफआरपी देण्यास कारखान्यांनी मुदत मागितली आहे.

Web Title: Sugarcane Galap After October