इंदापुरात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

निमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग याकडे लक्ष का घालत नाही, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.    

निमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग याकडे लक्ष का घालत नाही, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.    

इंदापूर-बारामती रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे सध्याचा रस्ता अपुरा पडत आहे. इंदापूरवरून बारामतीच्या दिशेने दुपारी तीन ते रात्री आठदरम्यान ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. दुपारी चार ते पाचदरम्यान या रस्त्यावरील गावांतील शाळा व विद्यालये सुटतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतात. या वेळेतच सर्व कार्यालयाची सुटी होत असल्याने गर्दी होते.

बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या दोन्ही ट्रॉलीत क्षमतेपेक्षा किती तरी जास्त ऊस भरलेला असतो. सोनमाथा चढ, निमगावातील चढ व त्यापुढील चढांना या वाहनांची पुढची चाके उचलली जातात. येथील ट्रॅक्‍टरचालकांची कसरत पाहून प्रवाशांच्या काळजात धस्स होते. ट्रॉली मागे जाऊ नये, यासाठी चाकांना लावलेले दगड बऱ्याचदा रस्त्यावरच असतात. सक्ती करूनही अनेक वाहनांना रिप्लेक्‍टर बसविलेले नाहीत. अनेक वाहनांचे टायर खराब झालेले असताना त्याच स्थितीत ते वापरले जात असल्याने त्याचा जास्त धोका आहे. ट्रॉलीमध्ये सपोर्टसाठी लावलेले खांबही चांगल्या स्थितीत नसल्याने वाहन सुरू असताना एखादा खांब मोडला तरी वाहतूक सुरू असते.

उड्या टाकल्याने तरुण बचावले
इंदापूर-बारामती रस्त्यावर आज सायंकाळी पाचच्या सुमारास शेळगाव-अंथुर्णे गावादरम्यान क्षमतेपेक्षा जास्त ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्‍टर दुसऱ्या ट्रॅक्‍टरला ओव्हरटेक करताना मागील ट्रॅक्‍टरची ट्रॉली भररस्त्यात उलटली. या वेळी प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत किरण गोरे म्हणाला, की ट्रॉली पडताना दिसल्यानंतर आम्ही गाडीचा ब्रेक दाबून तिघेजण उड्या टाकून पळालो म्हणून वाचलो. मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलवाल्याने स्वतःचा बचाव केला. संबंधित वाहनावर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिस्तीची गरज
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरचे सर्वच ठिकाणी अपघात वाढलेले आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरून ही धोकेदायक वाहतूक सुरू आहेत. संबंधित विभागाने वाहतुकीला शिस्त लावावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Sugarcane Transport Danger Process