आम्हालाबी शिकून मोठ्ठ व्हायचंय 

राधाकृष्ण येणारे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 मार्च 2017

सोमाटणे - पारंपरिक ऊस तोडणी न करता खूप शिकून मोठे व्हायचे, नोकरी व्यवसायाकडे वळायचे, ही जिद्घ आहे ऊस तोड कामगारांची. 

सोमाटणे - पारंपरिक ऊस तोडणी न करता खूप शिकून मोठे व्हायचे, नोकरी व्यवसायाकडे वळायचे, ही जिद्घ आहे ऊस तोड कामगारांची. 

गेल्या अनेक पिढ्यांपासून मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील गरीब शेतकरी, शेतमजूर हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राज्यातील विविध साखर कारखान्यांवर ऊस तोडणीचे काम करतात. सहा महिने ही रोजंदारी करून गावाकडे जाणे ही परंपरा अनेक पिढ्यांपासून हे शेतकरी करीत आले आहेत. सध्या हे ऊसतोड कामगार कासारसाई दारुंब्रे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर काम करीत आहेत. या कामानिमित्त मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. त्यामुळे सरकारने साखर कारखान्यांच्या परिसरात साखर शाळा सुरू केल्या आहेत. तिथे ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत; पण लहान भावंडांना सांभाळणे, घरची कामे करणे, त्यानंतर शिक्षण असा दिनक्रम या विद्यार्थ्यांचा ठरलेला असतो. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर गावाकडे स्थलांतर करावे लागते, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो; परंतु काहीच पर्याय नसल्याने पालकांनाही हे सत्य स्वीकारावे लागते. या पारंपरिक रोजंदारीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या मुलांची सध्या धडपड सुरू आहे. आपण खूप अभ्यास करायचा, खूप शिकायचे, मोठे व्हायचे, नोकरी व्यवसाय करायचा ही त्यांची इच्छा आहे. सध्या परीक्षांचा काळ सुरू असल्याने कारखान्यावरील झोपड्यांमध्ये ही मुले एकत्र बसून अभ्यास करताना दिसतात. या झोपड्यांमध्ये वीज नाही, पंखा नाही, तरीही त्यांची पर्वा न करता दिवसभर ही मुले अभ्यास करतात. याबाबत या मुलांना विचारले असता, त्यांनी शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. पूर्वापार चालत आलेला ऊस तोडणी व्यवसाय न करता शिक्षण घेऊन मोठे होण्याची इच्छा व्यक्त केली; पण त्यांना गरज आहे, स्थलांतरित न होता एकाच जागेवर शिक्षण मिळण्याची.

Web Title: Sugarcane workers