साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला 25 नोव्हेंबरचा मुहूर्त?

अप्पा खेडकर
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यातील साखर कारखाने 25 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत परवानगीसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्यपालांनी मंगळवारी (ता. 19) बैठकीची वेळ दिली आहे. यामध्ये या प्रस्तावाला निश्‍चित मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

देऊळगाव राजे (पुणे) : राज्यातील साखर कारखाने 25 नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत परवानगीसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव सादर केला आहे. राज्यपालांनी मंगळवारी (ता. 19) बैठकीची वेळ दिली आहे. यामध्ये या प्रस्तावाला निश्‍चित मंजुरी मिळेल, असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्यांच्या अकराव्या गळीत हंगामाची सुरवात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड शुगरचे अध्यक्ष जगदीश कदम होते. यावेळी कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे, पंचायत समितीच्या सभापती ताराबाई देवकाते, इंद्रजित जगदाळे, दौंडचे उपनगराध्यक्ष वसीम शेख, पूर्णवेळ संचालक शहाजी गायकवाड, ऍड. अजित सूर्यवंशी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, ""राज्यातील 195 साखर कारखान्यांपैकी 25 ते 30 साखर कारखाने डबघाईला आले आले आहेत. ते बंद झाल्यास शेतकऱ्याचा फायदा होईल. काही साखर कारखान्यावर मोठे कर्ज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस घालण्यासाठी काळजी घ्यावी. चालू वर्षी राज्यातील 89 साखर कारखान्यांना गाळपाचा परवाना दिला आहे. एफआरपी दिल्यानंतरच कारखान्यांना गाळपाचा परवाना देणार आहे.''
दौंड शुगर हा राज्यात सर्वांत चांगला कारखाना म्हणून पाहिला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील व परिसरातील कार्यकारी संचालकांची बैठक लवकरच दौंड शुगर कारखान्यावर बैठक घेतली जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

जगदीश कदम म्हणाले, ""चालू वर्षी पाच ते सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. कारखान्यांची चालूवर्षी एफआरपीची रक्कम 2700 रुपये आहे. वीरधवल जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शहाजी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन चांगदेव गिरमकर यांनी केले.

कारखाना उभारणीसाठी घेतलेल्या सरकारच्या भांगभाडवलाचे 10 लाख रुपये न दिल्यास गाळपाचा परवाना देणार नाही. कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढायची आहे. राज्यातील 30 साखर कारखान्याने डबघाईस आले असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम व कामगारांचा पगार दिलेला नाही.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suger Production In Maharashtra