आंबेगाव तालुक्यातील ऊसशेती धोक्‍यात

नवनाथ भेके
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सततचा पाऊस तसेच ढगाळ हवामान, उष्णता अशा वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्‍यातील ऊसशेती धोक्‍यात आली आहे. प्रामुख्याने 265 जातीच्या उसावर हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

निरगुडसर (पुणे) : सततचा पाऊस तसेच पावसामुळे तसेच ढगाळ हवामान, उष्णता अशा वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्‍यातील ऊसशेती धोक्‍यात आली आहे. प्रामुख्याने 265 जातीच्या उसावर हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

आंबेगाव तालुक्‍यात सहा ते सात हजार हेक्‍टर ऊसक्षेत्र आहे. त्यातील मोठ्या प्रमाणात उसाला तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामध्ये विशेषतः 265 जातीच्या उसावर हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. पूर्ण वाढ झालेल्या उसाबरोबर दोन, तीन, पाच महिन्याच्या उसालाही या रोगाचा फटका बसला आहे. भीमाशंकर व विघ्नहर साखर कारखाना अधिकाऱ्यांनी तातडीने शेताच्या बांधावर जाऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

निरगुडसर येथील रामदास थोरात, कैलास सुडके, बबू खिलारी, शरद कदम, फत्तेसिंग टाव्हरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाचा फटका पिकाच्या उत्पादनावर होऊ शकतो. आंबेगाव तालुक्‍यातील नागापूर, वळती, शिंगवे, निरगुडसर, भराडी, जवळे, खडकी, रांजणी, बेलसरवाडी आदी गावांसह तालुक्‍यातील विविध भागातही रोगांचा फटका बसला आहे.

ऊस गळीतावर परिणाम होणार ?
मागील वर्षीच्या दुष्काळाच्या परिणामामुळे आधीच ऊसक्षेत्र व ऊस उत्पादन कमी आहे. त्यामध्ये आता सततच्या पावसामुळे उसावर पडलेला तांबेरा रोगामुळे उत्पादनात घट होणार आहे. अधिकचा पाऊस पडत असल्यामुळे आपले उत्पादन आता वाढणार या आनंदात शेतकरी राजा होता. परंतु या पावसामुळे उसावर तांबेरा रोग पडला आहे. यामुळे उसाची वाढ थांबून उत्पादन घटीचा फटका शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचा परिणाम कारखान्यांच्या ऊस गाळपावर होणार आहे.

सततच्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे माझ्या ऊस पिकावर तांबेरा रोगाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे यामुळे उत्पादन घटणार आहेत परिसरातील अनेक ऊस पिकावरही या रोगाचा प्रादुर्भाव आहे यात 265 जातीच्या उसावर हा प्रादुर्भाव अधिक आहे तरी कारखान्यांनी तातडीने उपाययोजना करावी.
- रामदास यशवंत थोरात, शेतकरी, निरगुडसर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugercane Cultivation Affected In Ambegao Tehasil