ऊसतोड मजुरांची बहुतांश मुले शाळेपासून दूरच

रामदास जगताप
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

बारामती तालुक्‍यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी सालाबादप्रमाणे ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सांगवी (पुणे) : बारामती तालुक्‍यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी सालाबादप्रमाणे ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बारामती तालुक्‍यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व मालेगाव सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. दोन्ही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड मजुरांच्या मुलांची संख्या एक ते दीड हजार आहे. परंतु यातील बहुतांश मुले ही शाळेत जात नाहीत. त्यांना त्यांच्यापेक्षा लहान भावंडांचा सांभाळ करावा लागतो. अशी मुले शाळेपासून वंचित राहू नयेत म्हणून सरकारने शिक्षण हक्क कायदा केला आहे.

या कायद्यांतर्गत अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. हे काम कृतिशील व्हावे म्हणून केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी यांनी अधिक नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. सोमेश्वर साखर कारखाना परिसरात आशा प्रकल्पांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी खूप चांगले काम केले जात आहे. त्या तुलनेत माळेगाव करखान्यांतर्गत हे काम कमी प्रमाणात असल्याची प्रतिक्रिया बारामतीचे गट शिक्षण अधिकारी संजय जाधव यांनी दिली. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी यापुढे अधिक प्रयत्न केले जातील, असे जाधव यांनी सांगितले. तर बारामती तालुक्‍यातील काही शिक्षक ऊसतोड मजुरांच्या खोपीवर जाऊन मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती करीत आहेत.

कांबळेश्वर (ता. बारामती) येथील मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते, सुनीता शिंदे, निर्मला खताळ, मनीषा चव्हाण, सरपंच दुर्गा शिंदे, उपसरपंच सीमा जगताप, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सीमा खलाटे यांच्या प्रयत्नातून येथील जिल्हा परिषद शाळेत बुलडाणा जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील अठरा विद्यार्थी दाखल झाले आहेत. अशा प्रकारचे काम सर्वत्र होण्याची आवश्‍यकता आहे.
- संजय भोसले, सभापती, बारामती पंचायत समिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugercane Workers Children & Education