अपेक्षित गुण न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

साक्षी बेंडकुळे ही पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने गेल्या मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. आज सकाळी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये तिला 56 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती.

नाशिक : फुलेनगर (पंचवटी) येथे राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केली. साक्षी एकनाथ बेंडकुळे (16) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी बेंडकुळे ही पंचवटीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने गेल्या मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. आज सकाळी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये तिला 56 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील एकनाथ बेंडकुळे यांनी तिने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून उत्तीर्ण होण्यातच समाधानही व्यक्त केले होते. परंतु साक्षी कमी गुण मिळाल्याने नाराज होती. या नाराजीतूनच साक्षीने शुक्रवारी (ता.8) दुपारी पावणेतीनच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्त्या केली.

कुटुंबियाच्या लक्षात येताच तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता, त्यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच साक्षीच्या माता-पित्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्येच हंबरडा फोडला. फुलेनगर परिसरातील महिला-नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. अभ्यासू असलेल्या साक्षीच्या मृत्युमुळे फुलेनगर परिसरात हळहळ व्यक्त केली. तर, जिल्हा रुग्णालयात साक्षीच्या आई व नातलगांच्या शोकामुळे जमलेल्यांचेही हृदय हेलावले.

Web Title: Suicide of Class 10 student because of unexpected result

टॅग्स