सुसाइड नोट लिहून कुटुंब बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पिंपरी - कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या मागणीला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे कुटुंब सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाले आहे. १५ दिवसांनंतरही या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. ही घटना चिंचवड स्टेशन येथील मोहननगर परिसरात घडली. 

पिंपरी - कर्जबाजारीपणा आणि देणेकऱ्यांच्या मागणीला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे कुटुंब सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाले आहे. १५ दिवसांनंतरही या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. ही घटना चिंचवड स्टेशन येथील मोहननगर परिसरात घडली. 

संतोष एकनाथ शिंदे (वय ४७), पत्नी सविता शिंदे (वय ४१), मुलगा मुकुंद शिंदे (वय २२), मैथिली शिंदे (वय १८, सर्व रा. शिंदे निवास, मोहननगर, चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत संतोष यांचे बंधू नितीन एकनाथ शिंदे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक विलास पालांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे यांचा ओम ट्रान्स्पोर्ट नावाने व्यवसाय असून त्यांच्या दहा गाड्या आहेत. संतोष आणि नितीन हे एकाच इमारतीत राहतात. संतोष यांनी व्यवसाय आणि इतर कामांसाठी विविध ठिकाणांहून तब्बल दोन कोटींच्या आसपास कर्ज काढले होते. या कर्जाचे हप्ते भरू न शकल्याने त्यांना पतसंस्था तसेच कर्जदारांचे फोन येत होते. यामुळे शिंदे कुटुंब मानसिक दबावाखाली होते. याशिवाय राहत्या घरावरही कर्ज काढण्याचा त्यांचा विचार होता. 

फिरायला जाऊन येतो, असे भावाला सांगून ५ डिसेंबरला संपूर्ण कुटुंब घरातून निघाले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ सोडले. त्यानंतर ते बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी भाऊ आणि त्याचे कुटुंबीय घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या कुटुंबातील एकही जण फोन उचलत नव्हते. त्यांच्या भावाने त्यांच्या घराची तपासणी केली असता त्या चौघांचेही फोन घरातच होते. या वेळी घरच्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये शिंदे यांनी लिहिले होते की, ‘माझ्या साऱ्या व्यवहाराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी आणि माझा परिवार आत्महत्या करत आहोत.’ चिठ्ठीशेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या. 

मुकुंद शिंदे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत आहेत. तर मुलगी मैथिली ही १२ मध्ये आहे. मुकुंद यांची इंजिनिअरिंगची परीक्षा तोंडावर असतानाच हे कुटुंब बेपत्ता झाले आहे. या कुटुंबाबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास पिंपरी पोलिसांशी अथवा जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालांडे यांनी केले आहे.

Web Title: Suicide Note Family Missing Crime Loan