रसिकांच्या प्रेमामुळे इथवर आले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - वयाची नव्वदी ओलांडलेली... तरीही त्या कोणाचा फारसा आधार न घेता स्वत: रंगमंचावर आल्या... आजही तोच उत्साह आणि कलेबद्दल असलेले प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते... गुरू भालजी पेंढारकर आणि तुम्ही सगळे रसिक यांच्यामुळेच माझा इथवर प्रवास झाला, असे त्या अभिमानाने सांगत होत्या... तेव्हा रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना खास दाद दिली.

त्या अभिनेत्री म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटांत सोज्वळ भूमिका रंगविणाऱ्या सुलोचनादीदी. कलासंस्कृती परिवारातर्फे आयोजित "स्टार ऑफस्क्रिन पुरस्कार' सोहळ्यात त्यांना अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते "कलाकृतज्ञता सन्मान' प्रदान करण्यात आला. "बालगंधर्व'चे व्यवस्थापक भारत कुमावत, "प्रभात'चे विवेक दामले, तन्मय पेंडसे, धावपटू-निर्मात्या मिशेल काकडे, बाबा शिंदे, प्रकाशक प्रवीण जोशी यांना "समाजसंस्कृती' पुरस्काराने, शिवानंद अक्के यांना "निकोप सेवा' पुरस्काराने; तर पडद्यामागील पंचवीसहून अधिक कलावंतांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. चारुकाका सरपोतदार, परिवाराचे प्रमुख मेघराज राजेभोसले, सुधीर मांडके उपस्थित होते.

जॅकी श्रॉफ म्हणाले, ""या सोहळ्यानिमित्ताने सुलोचनादीदींना पाहता आले, त्यांच्याशी बोलता आले याचा आनंद आहे. त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज आजही पूर्वीसारखाच आहे.'' पडद्यामागील कलाकारांबद्दल बोलताना ते म्हणाले, ""आम्ही कलाकार फांद्या आहोत; पण पडद्यामागील कलाकार हे मूळ आहे. त्यामुळेच कलेचा प्रांत असा बहरलेला दिसतो. मूळ नसेल, तर कला बहरणार नाही, याची जाणीव आम्हा कलावंतांना आहे.'' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले यांच्यासह विविध कलावंतांच्या वेगवेगळ्या गीतांवरील नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणाची कुठली जात, कुठला धर्म... हे मनात येणारे प्रश्‍न विसरून जा. माणूस म्हणून जगा. एकमेकांशी गोड बोला. एकमेकांचा आदर करा. आई-वडिलांची सेवा करा. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- जॅकी श्रॉफ, अभिनेते

Web Title: sulochana didi Feeling