पुरेसे पाणी प्या, उन्हात फिरणे टाळा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे उष्माघातासारखे गंभीर आजार डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे उष्माघातासारखे गंभीर आजार डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

उष्माघाताच्या संभाव्य धोक्‍याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी ‘सावलीचा सहारा आणि उष्माघातापासून निवारा’ असे ब्रीदवाक्‍य आणि उन्हाळ्यात काय करावे, काय करू नये, याबाबतची माहिती सांगणाऱ्या भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. उन्हाळ्यातील संभाव्य आजारांबाबतच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचे १०७७ आणि १०८ असे दोन क्रमांक आहेत. या क्रमांकांवर दूरध्वनी केल्यास आरोग्य विभागाची मदत त्वरित मिळू शकेल, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

उन्हाळ्यात काय करावे
  तहान लागताच पुरेसे पाणी प्यावे.
  सौम्य रंगाचे, सैल, सुती कपडे वापरावेत.
  उन्हात जाताना टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करावा.
  घर नेहमी थंड राहील, याची काळजी घ्यावी.
  अशक्तपणा आला असेल, तर त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
  ओआरएस पावडर, लस्सी, लिंबूपाणी, ताक आदी प्यावे.

काय करू नये
  दुपारी १२ ते तीन या वेळेत उन्हात फिरू नये.
  मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळावीत.
  उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना उन्हाळ्यातील संभाव्य आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे. सर्व आरोग्य केंद्रांना यासाठीच्या आवश्‍यक गोळ्या-औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Summer Heat Temperature Drinking Water Health Care